मुंबई प्रतिनिधी
रेशन व्यवस्थेतील अपप्रवृत्ती रोखण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने ‘मिशन सुधार’ हे विशेष अभियान हाती घेतले असून, याअंतर्गत अपात्र लाभार्थ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. मृत व्यक्तींची नावे, एकाच व्यक्तीच्या नावावर दोन ठिकाणी रेशन कार्ड, तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही गरिबांचे धान्य उचलणाऱ्या तथाकथित बनावट लाभार्थ्यांची नावे यादीतून कायमची वगळली जाण्याची शक्यता आहे.
राज्यात अनेक ठिकाणी कुटुंबातील सदस्याचा मृत्यू होऊनही त्याचे नाव रेशन कार्डवरून वगळले जात नसल्याचे प्रकार समोर आले आहेत. तसेच काही लाभार्थी गाव आणि शहर अशा दोन्ही ठिकाणी रेशनचा लाभ घेत असल्याचेही निदर्शनास आले आहे. या गैरप्रकारांमुळे शासनावर अतिरिक्त आर्थिक बोजा पडत असून, खऱ्या गरजू कुटुंबांना धान्य मिळण्यात अडचणी येत आहेत.
या पार्श्वभूमीवर आता आधार कार्डशी संलग्नता (लिंकिंग) आणि प्रत्यक्ष घरोघरी तपासणी करण्यात येणार आहे. तालुका स्तरावरील पुरवठा निरीक्षक गावोगावी तसेच शहरी वस्त्यांमध्ये जाऊन लाभार्थ्यांची प्रत्यक्ष पडताळणी करत आहेत.
काय तपासले जात आहे?
या तपासणीदरम्यान कुटुंबातील सदस्यांची प्रत्यक्ष संख्या, त्यांचे आधार संलग्न आहे की नाही, वास्तव्यास असलेला पत्ता, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न, तसेच प्राधान्य गट (PHH) आणि अंत्योदय (AAY) रेशन कार्डासाठी ठरवलेले निकष पाळले जातात का, याची सखोल चौकशी केली जात आहे.
तपासणी पूर्ण झाल्यानंतर संशयास्पद लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी तयार केली जाणार आहे. एखाद्या लाभार्थ्याचे नाव रेशन कार्डावरून वगळायचे की नाही, याचा अंतिम निर्णय तहसीलदारांच्या स्तरावर घेतला जाणार आहे. नियमबाह्य किंवा त्रुटी आढळलेल्या रेशन कार्डांवर कायमस्वरूपी ‘फुली’ मारली जाणार असून, त्यामुळे राज्यातील एकूण रेशन कार्डांच्या संख्येत लक्षणीय घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या मोहिमेमुळे रेशन व्यवस्थेत शिस्त येईल आणि खऱ्या गरजू कुटुंबांपर्यंत अन्नधान्य पोहोचण्यास मदत होईल, असा विश्वास अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.


