मुंबई प्रतिनिधी
दावोसमध्ये आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राने तब्बल ३० लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक सामंजस्य करार (MoU) केले असून, आणखी १० लाख कोटी रुपयांच्या करारांबाबत प्राथमिक चर्चा पूर्ण झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या गुंतवणुकीतून राज्यात ४० लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील पत्रकारांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना मुख्यमंत्री बोलत होते. त्यांनी सांगितले की, या करारांपैकी ८३ टक्के गुंतवणूक थेट परकीय गुंतवणूक (FDI) स्वरूपातील असून, १८ देशांमधून महाराष्ट्रात भांडवल प्रवाह होत आहे. उर्वरित १६ टक्के गुंतवणूक परकीय तंत्रज्ञान भागीदारीतून येणार आहे.
या देशांमध्ये अमेरिका, इंग्लंड, सिंगापूर, जपान, स्वित्झर्लंड, स्वीडन, नेदरलँड, नॉर्वे, इटली, जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रिया, यूएई, स्पेन, कॅनडा आणि बेल्जियम यांचा समावेश आहे. औद्योगिक, सेवा, कृषी, तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांमध्ये ही गुंतवणूक होणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, सामंजस्य करार प्रत्यक्षात परावर्तित होण्याचा दर सुमारे ७५ टक्के असून, मागील वर्षी झालेले करार मोठ्या प्रमाणावर अंमलात आले आहेत. ही गुंतवणूक ३ ते ७ वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने प्रत्यक्षात येते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एसबीजी, ब्रुकफिल्ड, आर्सेलर मित्तल, फिनमन ग्लोबल, इस्सार, स्कोडा ऑटो, फॉक्सवेगन, एसटीटी टेलिमीडिया, टाटा, अदानी, रिलायन्स, जेबीएल, कोकाकोला, बॉश, कॅपिटल लँड, आयर्न माऊंटेन** यांसारख्या देशी-विदेशी कंपन्यांशी हे करार झाले आहेत. काही भारतीय कंपन्यांची १६५ हून अधिक देशांमध्ये गुंतवणूक असल्याने त्याचा जागतिक लाभ महाराष्ट्राला होणार आहे.
ही गुंतवणूक क्वांटम कम्प्युटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स (GCC), डेटा सेंटर्स, आरोग्य, अन्न प्रक्रिया, ग्रीन स्टील, नगरविकास, जहाजबांधणी, फिनटेक, लॉजिस्टिक्स आणि डिजिटल पायाभूत सुविधा या क्षेत्रांत होणार आहे.
राज्यभर समतोल गुंतवणूक
राज्यातील गुंतवणूक भौगोलिकदृष्ट्या संतुलित राहील, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी नमूद केले की, एमएमआर व कोकणात २२ टक्के, विदर्भात १३ टक्के, तर उर्वरित ५० टक्के गुंतवणूक राज्याच्या इतर भागांत होणार आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, अहिल्यानगर भागात सुमारे ५० हजार कोटी, मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये ५५ हजार कोटी, कोकणात ३.५ लाख कोटी, तर नागपूर व विदर्भात २.७ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.
याशिवाय जायका, जेबीआयसी, युनिव्हर्सिटी ऑफ बर्कले, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया आणि स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या स्टॅनफोर्ड बायोडिझाईन यांसारख्या संस्थांशीही महत्त्वाचे करार करण्यात आले आहेत.
देशातील पहिली ‘इनोव्हेशन सिटी’
टाटा समूहाच्या सहकार्याने मुंबईजवळ देशातील पहिली ‘इनोव्हेशन सिटी’ उभारण्यात येणार असून, येत्या ६ ते ८ महिन्यांत याचे सविस्तर नियोजन जाहीर होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. यासाठी १ लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक टाटा समूहाकडून होणार असून, इतर आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारही सहभागी होतील.
मुंबईत सर्क्युलर इकॉनॉमी
मुंबईत सर्क्युलर इकॉनॉमी विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे पाणी, हवा आणि कचरा व्यवस्थापनाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पुढील २ ते ३ वर्षांत याचे ठोस परिणाम दिसून येतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
तसेच रायगड–पेण ग्रोथ सेंटरची घोषणा दावोसमध्ये करण्यात आली असून, यामुळे नवीन बिझनेस डिस्ट्रीक्ट उभे राहणार आहे. या प्रकल्पासाठी १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आधीच प्राप्त झाल्याची माहितीही त्यांनी दिली.


