मुंबई प्रतिनिधी
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी शहरात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होणाऱ्या या मतदानात, महानगरपालिका मतदार यादीत नाव असलेल्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार असून, मतदार छायाचित्र ओळखपत्र नसले तरी चिंता करण्याचे कारण नाही, असा दिलासा राज्य निवडणूक आयोगाने दिला आहे.
महानगरपालिका प्रशासनाकडून घरोघरी मतदार चिठ्ठ्यांचे वितरण सुरू असून, त्यामध्ये मतदाराचे नाव, यादी भाग क्रमांक, अनुक्रमांक तसेच मतदान केंद्राचे ठिकाण नमूद करण्यात आले आहे. यामुळे मतदारांना आपले मतदान केंद्र सहज ओळखता येणार आहे.
ओळखपत्र नसल्यास काय?
मतदान केंद्रावर सामान्यतः मतदार छायाचित्र ओळखपत्र (Voter ID) दाखवून मतदान करता येते. मात्र, एखाद्या पात्र मतदाराकडे हे ओळखपत्र उपलब्ध नसल्यास, राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निश्चित केलेल्या ११ पर्यायी ओळखीच्या पुराव्यांपैकी कोणताही एक दाखवून मतदान करण्याची मुभा देण्यात आली आहे. यामुळे कोणत्याही पात्र मतदाराचा मतदानाचा हक्क केवळ ओळखपत्राअभावी हिरावला जाणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे.
मतदान केंद्रावर मोबाईलला बंदी
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व शिस्तबद्ध ठेवण्यासाठी मतदान केंद्रावर मोबाईल फोन घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मतदारांनी आपले मोबाईल फोन मतदान केंद्राच्या बाहेर, स्वतःच्या जबाबदारीवर ठेवावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मतदानासाठी ग्राह्य धरली जाणारी ओळखपत्रे (कोणतेही एक)
१) मतदार छायाचित्र ओळखपत्र
२) पासपोर्ट
३) आधार कार्ड
४) ड्रायव्हिंग लायसन्स
५) पॅन कार्ड
६) सरकारी कर्मचाऱ्यांचे फोटोसहित ओळखपत्र
७) राष्ट्रीयकृत बँक किंवा पोस्ट ऑफिसचे फोटो असलेले पासबुक
८) सक्षम प्राधिकरणाने दिलेले फोटोसहित अपंगत्व प्रमाणपत्र
९) केंद्र सरकारच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे फोटोसहित कार्ड
१०) फोटो असलेले पेन्शन कार्ड
११) स्वातंत्र्य सैनिकांचे फोटोसहित ओळखपत्र
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांनी योग्य ओळखपत्र सोबत ठेवून वेळेत मतदान केंद्रावर उपस्थित राहावे आणि लोकशाहीच्या या उत्सवात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


