मुंबई प्रतिनिधी
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवार, १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, त्यासाठी महापालिका प्रशासनाने व्यापक तयारी पूर्ण केली आहे. मुंबईतील सुमारे ८५ लाख मतदारांपर्यंत मतदार माहिती चिठ्ठ्यांचे वितरण पूर्ण करण्यात आले असून, उर्वरित सुमारे १५ लाख चिठ्ठ्या संबंधित मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांना मतदान केंद्रासंबंधीची माहिती सुलभपणे मिळावी, यासाठी मतदार माहिती चिठ्ठ्यांचे वितरण करण्यात आले आहे. या चिठ्ठ्यांमध्ये मतदारांचे नाव, पत्ता, मतदार यादीतील भाग क्रमांक, मतदान केंद्राचे नाव व खोली क्रमांक आदी तपशीलांचा समावेश आहे. ही जबाबदारी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने पार पाडली असून, प्रशासकीय वॉर्डनिहाय अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी चिठ्ठ्या वितरित करण्यात आल्या.
या पार्श्वभूमीवर १५ जानेवारी रोजी सर्व पात्र मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी केले आहे.
दरम्यान, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांनी सांगितले की, मतदान प्रक्रिया अधिक सोपी व सुलभ व्हावी आणि मतदानाची टक्केवारी वाढावी, या उद्देशाने मतदानापूर्वीच मतदार माहिती चिठ्ठ्यांचे वितरण करण्यात आले. या कामासाठी एकूण ६,७०१ कर्मचाऱ्यांची तैनाती करण्यात आली होती. त्यामध्ये ५,१३८ महापालिका कर्मचारी, ९४५ स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, १०० आशा कार्यकर्त्या आणि ५१८ बूथस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांचा समावेश होता.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान स्वच्छता राखण्यासाठीही विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मुंबईतील १०,२३१ मतदान केंद्रांवर निवडणुकीपूर्वी तसेच मतदानाच्या दिवशी व्यापक स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. मतदार व कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी चार हजारांहून अधिक शौचालये, त्यामध्ये पोर्टेबल आणि मोबाइल युनिट्सचा समावेश, उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच १४ व १५ जानेवारी २०२६ रोजी विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार असून, सर्व मतदान केंद्रांवर अतिरिक्त स्वच्छता कर्मचारी तैनात करण्यात आले असल्याचे दिघावकर यांनी स्पष्ट केले.


