मुंबई प्रतिनिधी
मतदान प्रक्रियेत वापरण्यात येणाऱ्या नव्या यंत्रणेबाबत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप करत, “या मशीनमुळे मतदानात कोणतीही गडबड होणार नाही याची खात्री नेमकी कोण देणार?” असा थेट सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी उपस्थित केला. तसेच मतदानाच्या आदल्या दिवशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदारांना भेटण्यास दिलेल्या मुभेवरही त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला.
दादर येथील शीवतीर्थावर राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत राज ठाकरे बोलत होते. प्रचार थांबल्यानंतरचा एक दिवस ‘शांतता दिवस’ म्हणून राखण्याची परंपरा आजवर पाळली जात होती, असे नमूद करत त्यांनी निवडणूक प्रक्रियेत अलीकडे करण्यात येत असलेल्या बदलांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
“काल सायंकाळी पाच वाजता प्रचार थांबला. आतापर्यंत आम्ही पाहिलेल्या निवडणुकांमध्ये प्रचार थांबल्यानंतर दुसरा दिवस रिकामा आणि त्यानंतर मतदान अशीच पद्धत होती. मात्र यावेळी मतदानाच्या आदल्या दिवशी पाच वाजेपर्यंत मतदारांना भेटण्याची मुभा देण्यात आली आहे. ही नवी प्रथा कुठून आली? लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ती का नव्हती?” असा सवाल त्यांनी केला.
पत्रक वाटण्यास बंदी असूनही प्रत्यक्ष भेटीची मुभा देण्यात आल्याने ही वेळ ‘पैसे वाटण्यासाठी’ दिली आहे का, असा संशय व्यक्त करत त्यांनी या नियमबदलामागील कारणे स्पष्ट करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली.
याचबरोबर, ‘पाडू’ (Printing Auxiliary Display Unit) नावाची नवी यंत्रणा मतदान प्रक्रियेत आणण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करत, याबाबत कोणत्याही राजकीय पक्षाला पूर्वकल्पना देण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने या संदर्भात निवडणूक आयोगाला पत्र दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.
“निवडणुकीच्या तोंडावर रोज नवे नियम, नवी यंत्रणा आणली जात आहे. ही बेबंदशाही कशासाठी? सरकारला हवे ते घडवून आणण्यासाठी निवडणूक आयोग काम करत आहे का?” असा सवाल करत त्यांनी आयोगाच्या भूमिकेवर गंभीर शंका व्यक्त केली.
सत्ताधारी पक्षाकडून कथितपणे पैसे वाटप होत असल्याच्या तक्रारींचाही त्यांनी उल्लेख केला. “शिंदे गटाकडून पैसे वाटले जात असल्याचे दिसते, मात्र नागरिक ते नाकारत आहेत, ही दिलासादायक बाब आहे,” असे ते म्हणाले.
या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपापल्या विभागात व मतदान केंद्रांवर सतर्क राहावे, असे आवाहन करत, जनतेनेही निवडणूक प्रक्रियेबाबत प्रश्न विचारावेत, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.


