नवी दिल्ली वृत्तसंस्था
संसदेचे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन २८ जानेवारीपासून सुरू होणार असून ते २ एप्रिलपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनात केंद्र सरकारचा बहुप्रतीक्षित अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.
यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिला टप्पा २८ जानेवारीपासून सुरू होऊन १३ फेब्रुवारी रोजी संपेल. त्यानंतर अधिवेशन सुमारे महिनाभरासाठी तहकूब होईल आणि दुसरा टप्पा ९ मार्चपासून सुरू होऊन २ एप्रिल रोजी संपणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ जानेवारी रोजी ‘बीटिंग द रिट्रीट’ या समारंभामुळे संसदेचे कामकाज तहकूब केले जाण्याची शक्यता आहे. यानंतर ३० जानेवारी रोजी आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाऊ शकते. तर ३१ जानेवारी रोजी लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब राहण्याची शक्यता आहे.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अधिवेशनाची औपचारिक सुरुवात होणार असून, त्यानंतर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्ताव आणि केंद्रीय अर्थसंकल्पावर सविस्तर चर्चा केली जाणार आहे. या चर्चेनंतर संसद १३ फेब्रुवारीपासून सुमारे एक महिन्यासाठी तहकूब केली जाईल.
दुसऱ्या टप्प्यात अर्थसंकल्पाशी संबंधित विविध विधेयके, अनुदान मागण्या तसेच इतर महत्त्वाच्या कायदेविषयक कामकाजावर चर्चा होणार आहे. अधिवेशनाचा शेवट गुरुवार, २ एप्रिल रोजी होईल.
देशाच्या आर्थिक दिशादर्शक ठरणाऱ्या या अधिवेशनाकडे सर्वच राजकीय पक्षांचे आणि उद्योगजगताचे लक्ष लागले असून, आगामी अर्थसंकल्पातून सरकार कोणते निर्णय जाहीर करते, याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.


