मुंबई प्रतिनिधी
आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत जवळ येत असताना सर्वच प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या नावांबाबत मोठी गुप्तता पाळली जात आहे. राजी-नाराजी, अंतर्गत बैठका आणि शेवटच्या क्षणापर्यंत सुरू असलेली नावनिश्चिती यामुळे मुंबईचे राजकारण तापलेले असतानाच काँग्रेसने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक – २०२६ साठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येत आहे. निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन आणि शुभेच्छा…
आपली मुंबई घडवूया…
मुंबईच्या हितासाठी काँग्रेसला निवडूया..#Mission2026 #Mumbai… pic.twitter.com/y8X1hRLL1m— Mumbai Congress (@INCMumbai) December 29, 2025
भाजप आणि शिवसेना (ठाकरे गट) यांनी आधीच ७० हून अधिक उमेदवारांची नावे जाहीर केल्यानंतर काँग्रेसनेही बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ साठी आपल्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत एकूण ७० उमेदवारांचा समावेश असून, काही संवेदनशील आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या प्रभागांमध्ये काँग्रेसने थेट आव्हान उभे केले आहे.
विशेष लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे, शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या माहिम मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक १९२ मधून काँग्रेसने दीपक भिकाजी वाघमारे यांना उमेदवारी दिली आहे. ठाकरेंच्या राजकीय प्रभावाखालील या मतदारसंघात काँग्रेसचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून, महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधील समन्वय आणि जागावाटपावरही त्यामुळे राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.
काँग्रेस पक्षाने ही उमेदवारांची यादी अधिकृतपणे आपल्या सोशल मीडिया हँडलवर प्रसिद्ध केली आहे. “बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ साठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येत आहे. निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन व शुभेच्छा. आपली मुंबई घडवूया, मुंबईच्या हितासाठी काँग्रेसला निवडूया,” असा संदेश काँग्रेसकडून देण्यात आला आहे.
दरम्यान, या पहिल्या यादीमुळे काँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांमध्ये समाधान आणि नाराजी दोन्ही भावना दिसून येत आहेत. काही प्रभागांमध्ये स्थानिक नेत्यांना डावलल्याच्या चर्चा असून, पुढील यादीत बदल किंवा नव्या नावांचा समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे, भाजप आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्याकडून उर्वरित उमेदवारांची अंतिम यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता असल्याने मुंबईतील महापालिका निवडणूक अधिक चुरशीची होणार, हे स्पष्ट आहे.
महानगरपालिकेतील सत्तासमीकरणे, महाविकास आघाडीतील अंतर्गत समन्वय आणि स्थानिक मुद्द्यांवर आधारित लढती यामुळे येत्या काही दिवसांत मुंबईचे राजकारण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.


