मुंबई प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत अवघी दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना, मुंबईच्या राजकारणातील अंतर्गत अस्वस्थता उघडपणे समोर येऊ लागली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या २२७ प्रभागांसाठी इच्छुक उमेदवारांची धावपळ तीव्र झाली असून, शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ‘मातोश्री’बाहेर नाराज उमेदवारांनी थेट आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
“आम्हाला न्याय द्या,” अशी आर्त मागणी करत काही इच्छुक उमेदवारांनी मातोश्रीबाहेर ठिय्या मांडला. हातात आपल्या कार्याचे, प्रचाराचे फोटो घेत, काही जण भावूक होत उद्धव ठाकरे यांच्यासमोर उमेदवारीची मागणी करताना दिसून आले. हात जोडून, डोळ्यांत पाणी आणत केलेली विनवणी आणि चेहऱ्यावर उमटलेली अस्वस्थता, हे दृश्यच या राजकीय संघर्षाचे वास्तव सांगून जात होते.
नाराज उमेदवारांपैकी काहींनी २०१७ च्या निवडणुकीचा दाखला दिला. “त्या वेळी ओबीसी वॉर्डमध्ये दुसऱ्यांना तिकीट देण्यात आलं. आम्हालाही संधी देण्यात आली होती, मात्र निकाल आमच्या बाजूने लागला नाही. आता पुन्हा एकदा संधी द्यावी,” अशी भूमिका त्यांनी मांडली. काहींनी आपल्या कुटुंबीयांच्या, विशेषतः वडिलांच्या सामाजिक कार्याचा उल्लेख करत, “१८६ वॉर्डमध्ये आमच्या कुटुंबाने वर्षानुवर्षे काम केलं आहे. लोकांचे प्रश्न सोडवण्याची क्षमता आमच्यात आहे आणि मतदारांचा विश्वासही आमच्यावर आहे,” असा दावा केला.
दरम्यान, मुंबई महापालिका निवडणूक ही केवळ स्थानिक राजकारणापुरती मर्यादित न राहता, प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रतिष्ठेची लढाई बनली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पक्षांकडून एबी फॉर्मचे वाटप अंतिम टप्प्यात असून, या प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. मात्र, याच टप्प्यावर असंतोष उफाळून येत असल्याने, बंडखोरीचे सावटही अधिक गडद होत असल्याचे संकेत मिळत आहेत.
ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून आतापर्यंत ४० उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, उर्वरित इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता वाढली असून, मातोश्रीबाहेर एबी फॉर्म मिळवण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचे चित्र आहे.
आता शेवटच्या दोन दिवसांत पक्ष नेतृत्व कोणते निर्णय घेते, असंतोष कितपत शमतो आणि किती प्रमाणात बंडखोरी उफाळून येते, याकडे संपूर्ण मुंबईचे लक्ष लागून राहिले आहे. महापालिकेच्या रणधुमाळीत उमेदवारीची ही धग निवडणुकीचा सूर ठरवणारी ठरेल, हे मात्र निश्चित.


