सुधाकर नाडर | प्रतिनिधी
मुंबई : केंद्र सरकारच्या नशामुक्त भारत अभियानाच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या मोहिमेअंतर्गत मुंबई पोलिसांनी सुरू केलेल्या नशामुक्त मुंबई अभियानाला मोठे यश मिळाले आहे. वर्ष २०२५ मध्ये मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी कारवाईत तब्बल ८१४ कोटी रुपये किमतीचे १६५३ किलो अंमली पदार्थ जप्त केले आहेत.
या कालावधीत अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये १०९६ गुन्हे दाखल करण्यात आले असून १३८६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच पीटीएनडीपीएस कायद्याअंतर्गत दोन आरोपींना स्थानबद्ध करण्यात आले आहे.
३० जुलै २०२५ रोजी महाराष्ट्र सरकारने संघटित अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या टोळ्यांविरोधात मोक्का कायद्याअंतर्गत कठोर कारवाईच्या सूचना दिल्यानंतर, मुंबई पोलिसांनी दोन संघटित टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे. या प्रकरणांमध्ये संबंधित आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
मुंबई पोलिसांनी यंदा केवळ जप्तीपुरतीच कारवाई न करता, २५६० किलो अंमली पदार्थ नष्ट केले असून, त्याची अंदाजे किंमत १३६ कोटी रुपये आहे. याशिवाय परदेशातून भारतात अंमली पदार्थांचे रॅकेट चालवणाऱ्या चार आरोपींना प्रत्यार्पण करून भारतात आणून अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, येणाऱ्या नऊ दिवसांच्या उत्सव काळात कुठेही अंमली पदार्थांचा वापर होऊ नये यासाठी मुंबई पोलीस अधिक सतर्क झाले आहेत. प्रत्येक पोलिस स्टेशन आणि अंमली पदार्थ विरोधी कक्षामार्फत विशेष पथके तैनात करण्यात आली असून, अंमली पदार्थांचा वापर किंवा तस्करी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
ही माहिती डीसीपी, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, मुंबई, नवनाथ ढवळे यांनी दिली आहे.


