मुंबई प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप सुरू असतानाच, काल मध्यरात्री मातोश्रीवर नाराजीचे नाट्य रंगल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. वांद्र्यातील एका उमेदवारीवरून ठाकरे गटातील दोन निकटवर्तीय नेत्यांमध्ये मतभेद उफाळून आले असून, याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते आणि विधानपरिषदेचे आमदार अनिल परब हे बैठक अर्धवट सोडून तडक निघून गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख जवळ येत असताना, काल रात्री मातोश्रीवर निवडक उमेदवारांना बोलावून एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत, सुमारे अडीच वाजेपर्यंत हे सत्र सुरू होते. मात्र याच बैठकीदरम्यान वांद्र्यातील वॉर्ड क्रमांक ९५ च्या उमेदवारीवरून मोठा मतभेद निर्माण झाल्याचे समजते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वॉर्ड क्रमांक ९५ मधून हरी शास्त्री यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. हरी शास्त्री हे स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे श्रीकांत सरमळकर यांचे जावई आहेत. मात्र या उमेदवारीला अनिल परब यांचा विरोध होता. परब यांच्या मते, स्थानिक पातळीवर वेगळ्या चेहऱ्याला संधी द्यायला हवी होती. याउलट, वांद्र्याचे आमदार आणि आदित्य ठाकरे यांचे नातेवाईक असलेले वरुण सरदेसाई यांनी हरी शास्त्री यांच्या उमेदवारीचा ठाम पाठपुरावा केला.
याच मुद्द्यावरून बैठकीत वातावरण तापले आणि अखेर अनिल परब यांनी नाराजी व्यक्त करत बैठक सोडल्याचे सांगितले जाते. ठाकरे कुटुंबाच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे हे दोन्ही नेते आमनेसामने आल्याने, पक्षातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघड झाले आहेत.
दरम्यान, ठाकरे गट आणि मनसे यांच्यात मराठी मतांची फाटाफूट टाळण्यासाठी नुकतीच युती जाहीर करण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात जागावाटपावरून अनेक ठिकाणी तिढा कायम आहे. ज्या प्रभागांमध्ये दोन्ही पक्षांचे दावे मजबूत आहेत, त्या ठिकाणी अद्याप एबी फॉर्मचे वाटप करण्यात आलेले नाही. वांद्र्यासारख्या प्रतिष्ठेच्या भागात उमेदवारीवरून झालेला हा वाद, आगामी दिवसांत आणखी गडद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मध्यरात्री मातोश्रीवर घडलेल्या या घडामोडींमुळे ठाकरे गटातील अंतर्गत राजकारण पुन्हा चर्चेत आले असून, उमेदवारीच्या शेवटच्या टप्प्यात पक्ष नेतृत्वाला तणाव सांभाळण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.


