मुंबई प्रतिनिधी
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) मुंबईतील काही प्रमुख वॉर्डांतील उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. भाजपकडून नील सोमय्या, नवनाथ बन यांच्यासह नऊ उमेदवारांना उमेदवारी देण्यात येणार असून, हे सर्व उमेदवार आजच आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली.
भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांना वॉर्ड क्रमांक ४७ मधून उमेदवारी देण्यात आली आहे. माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांना वॉर्ड क्रमांक ९, तर माजी नगरसेवक जितेंद्र पटेल यांना वॉर्ड क्रमांक १० मधून उमेदवारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि भाजपचे राज्य माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनाही मुंबईतून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. मानखुर्द–शिवाजीनगर येथील प्रभाग क्रमांक १३५ मधून ते निवडणूक लढवणार आहेत.
भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांना वॉर्ड क्रमांक १०७ मधून उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय संतोष ढाले (वॉर्ड २१५), स्नेहल तेंडुलकर (वॉर्ड २१८), अजय पाटील (वॉर्ड २१४), सन्नी सानप (वॉर्ड २१९) आणि तेजस्वी घोसाळकर (वॉर्ड २) यांचीही नावे निश्चित करण्यात आली आहेत. अधिकृत घोषणा थोड्याच वेळात केली जाणार असली, तरी संबंधित उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना आधीच देण्यात आल्याचे समजते.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप तब्बल १२८ जागांवर निवडणूक लढवणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज आणि उद्या असे केवळ दोनच दिवस शिल्लक असतानाही, पक्षाकडून संपूर्ण उमेदवार यादी जाहीर करण्यात आलेली नाही. संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी ही खबरदारी घेण्यात आल्याचे भाजपच्या सूत्रांकडून सांगण्यात येते.
दरम्यान, रविवारी रात्रीपासून दादर येथील वसंतस्मृती कार्यालयातून भाजप उमेदवारांना ‘एबी फॉर्म’चे वाटप सुरू झाले आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षातील नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याची जबाबदारी स्थानिक आमदारांवर सोपवण्यात आल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
संजय राऊतांवर टीका करणारे नवनाथ बन रिंगणात
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना सातत्याने प्रत्युत्तर देणारे भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांना मुंबईतून उमेदवारी देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मानखुर्द–शिवाजीनगरच्या वॉर्ड क्रमांक १३५ मधून ते निवडणूक लढवणार असून, गेल्या निवडणुकीत या प्रभागातून शिवसेनेचा विजय झाला होता. त्यामुळे या लढतीकडे विशेष लक्ष लागण्याची शक्यता आहे.


