मुंबई प्रतिनिधी
अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, उमेदवारांच्या घोषणांना सुरुवात झाली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर आता भाजपकडूनही उमेदवारांची नावे समोर येऊ लागली आहेत. भाजपकडून पहिल्या टप्प्यात चार उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली असून, हे चारही उमेदवार उद्या आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
यामध्ये विशेष लक्ष वेधून घेतले आहे ते नुकतेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या तेजस्वी घोसाळकर यांच्या उमेदवारीने. दहिसर येथील वॉर्ड क्रमांक २ मधून तेजस्वी घोसाळकर उद्या २९ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, यानिमित्ताने भव्य रॅली काढत शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. त्यांच्या या उमेदवारीकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.
दरम्यान, आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती तसेच ठाकरे बंधूंच्या आघाडीकडून कोणत्याही क्षणी उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सर्वच पक्षांतील इच्छुक उमेदवार अंतिम यादी आणि एबी फॉर्मच्या प्रतीक्षेत आहेत. भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना मुंबईत एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले असून, दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाचे सूत्र जवळपास निश्चित झाले आहे. मात्र, भाजपकडून अद्याप अधिकृतपणे उमेदवारांची संपूर्ण यादी जाहीर करण्यात आलेली नाही.
असे असले तरी, काही संभाव्य उमेदवारांनी स्वतःच्या सोशल मीडिया खात्यांवरून अर्ज दाखल करण्याची माहिती दिली आहे. ‘दहिसर – वॉर्ड क्रमांक २ मधून उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यानिमित्त आयोजित भव्य रॅलीमध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,’ असे आवाहन तेजस्वी घोसाळकर यांनी सोशल मीडियावर केले आहे.
मलबार हिल मतदारसंघातून चार उमेदवार निश्चित
दरम्यान, उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या मलबार हिल मतदारसंघातून भाजपकडून चार उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. वॉर्ड क्रमांक २१५ मधून संतोष ढाले, वॉर्ड २१८ मधून स्नेहल तेंडुलकर, वॉर्ड २१४ मधून अजय पाटील, तर वॉर्ड २१९ मधून सन्नी सानप हे भाजपचे उमेदवार असणार आहेत. हे चारही उमेदवार उद्या आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता अधिकृत घोषणांना वेग येणार असून, येत्या काही दिवसांत प्रमुख पक्षांकडून उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.


