मुंबई प्रतिनिधी
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला आणखी एक धक्का बसला असून, वंचित बहुजन आघाडीशी युतीची घोषणा होताच मुंबईतील काँग्रेसचे विभागीय आदिवासी अध्यक्ष सुनिल कुमरे यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. वरिष्ठांकडे मेलद्वारे पाठवलेल्या राजीनाम्यात त्यांनी युती प्रक्रियेत स्थानिक नेतृत्वाला विश्वासात न घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे.
मुंबईत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युतीवर गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. दोन जागांवरून ही युती रखडली होती. अखेर काँग्रेसने माघार घेत या दोन्ही जागा वंचित बहुजन आघाडीला सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, यातील दोन्ही वार्ड हे आदिवासी समाजासाठी राखीव असल्याने काँग्रेसच्या स्थानिक आदिवासी नेतृत्वात तीव्र नाराजी पसरली.
महापालिकेतील आदिवासींसाठी राखीव असलेले वार्ड क्रमांक १२१ आणि ५३ वंचित बहुजन आघाडीला देण्यात आल्याने, मुंबई विभागीय आदिवासी काँग्रेस अध्यक्ष सुनिल कुमरे यांनी या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. पक्षाने युती करताना स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांशी कोणतीही चर्चा न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
राजीनाम्यात कुमरे यांनी नमूद केले आहे की, आरे कॉलनी परिसरात काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे सातत्याने काम केले. मात्र, युतीच्या नावाखाली आदिवासी समाजावर अन्याय केला गेला. इच्छुक उमेदवारांकडे निधीविषयक प्रश्न विचारून वरिष्ठ नेत्यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
मुंबई महापालिका निवडणूक ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेची निवडणूक मानली जाते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. ठाकरे बंधू एकत्र येत निवडणुकीच्या रणांगणात उतरणार असून, महायुतीत भाजप आणि शिंदे गटाची युती निश्चित मानली जात आहे. तर अजित पवार गट स्वतंत्र लढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस–वंचित युतीची घोषणा झाली असली, तरी अंतर्गत नाराजी उघडपणे समोर येऊ लागली आहे.
सुनिल कुमरे यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस पक्ष यावर काय भूमिका घेतो, तसेच नाराज नेत्यांची मनधरणी केली जाते का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मुंबईत आदिवासी समाजात या घडामोडींचा काय परिणाम होतो, हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.


