मुंबई प्रतिनिधी
गोरेगाव येथील एका बांधकाम व्यावसायिकाकडून तब्बल १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने दोन महिलांना रंगेहाथ अटक केली आहे. या प्रकरणात मराठी अभिनेत्री हेमलता पाटकर हिच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदर घटनेमुळे चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कांदिवली येथील रहिवासी हेमलता आदित्य पाटकर उर्फ हेमलता बाणे (वय ३९) आणि सांताक्रूझ येथील अमरिना इक्बाल झवेरी उर्फ एलिस उर्फ अमरिना मॅथ्यू फर्नांडिस (वय ३३) यांचा समावेश आहे. न्यायालयाने दोघींनाही सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पहिल्या टप्प्यातील पोलीस कोठडी संपल्यानंतर शनिवारी आरोपींना एस्प्लेनेड न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी सरकारी वकिलांनी तपासासाठी अधिक वेळेची आवश्यकता असल्याचे नमूद करत वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली, जी न्यायालयाने मान्य केली.
अभिनेत्रीविरोधात यापूर्वीही गुन्हा
पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार, हेमलता पाटकर हिच्याविरोधात यापूर्वीही मेघवाडी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ४५२ (घरात घुसखोरी), ३२३ (मारहाण) आणि ५०४ (शिवीगाळ) अंतर्गत गुन्हा दाखल आहे. त्यामुळे आरोपींनी याआधीही अशा स्वरूपाचे गुन्हे केले आहेत का, याची तपासणी आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
तपासात सहकार्याचा अभाव
अभियोजन पक्षाच्या म्हणण्यानुसार, खंडणीची रक्कम कशी, केव्हा आणि कोणत्या पद्धतीने देण्यात येणार होती, याबाबतचा सविस्तर लेखी पुरावा तक्रारदाराने सादर केला आहे. मात्र, तपासासाठी अत्यावश्यक असलेले काही पुरावे अद्याप गोळा करायचे आहेत.
हेमलता पाटकर हिचे हस्ताक्षराचे नमुने घेणे बाकी असून, अमरिना झवेरी हिचे आवाजाचे नमुनेही अद्याप नोंदवलेले नाहीत. तसेच, दोन्ही आरोपी तपासात अपेक्षित सहकार्य करत नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या महिलांनी इतर फरार आरोपींसोबत संगनमत करून आणखी काही पीडितांकडूनही खंडणी उकळली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
बिल्डरकडून तक्रार
या प्रकरणातील तक्रारदार अरविंद गोयल (वय ५२) हे गोरेगाव पश्चिम येथील रहिवासी असून, ते बांधकाम व्यवसायिक आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या मुलावर आंबोली पोलीस ठाण्यात दाखल असलेला फौजदारी गुन्हा मिटवून देण्याच्या नावाखाली आरोपींनी त्यांच्याकडे १० कोटी रुपयांची मागणी केली होती. अखेर त्यांनी या संदर्भात गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली.
या प्रकरणाचा तपास खंडणीविरोधी पथकाकडून सुरू असून, आणखी आरोपींची नावे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.


