• योगी आदित्यनाथांसह भोजपुरी कलाकार प्रचार
मुंबई प्रतिनिधी
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात अनेक हुतात्म्यांनी आपल्या रक्ताची आहुती देत मराठी माणसासाठी मुंबई जपली. मात्र कालांतराने मुंबईच्या लोकसंख्यात्मक रचनेत मोठा बदल झाला असून मराठी भाषिकांचे प्रमाण सातत्याने घटत गेले आहे. याच पार्श्वभूमीवर आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत ‘मराठी अस्मिता’ हा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे.
मराठी भाषेच्या आणि मराठी माणसाच्या प्रश्नावरून ठाकरे बंधूंनी एकत्र येत भाजप सरकारवर दुजाभावाचा आरोप केला असताना, भाजपने मात्र वेगळा राजकीय डाव खेळण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. मुंबईतील मोठ्या प्रमाणावरील उत्तर भारतीय मतदारांना लक्षात घेता भाजपने थेट उत्तर प्रदेश आणि बिहारमधील नेत्यांची व कलाकारांची फौज प्रचारात उतरवण्याची रणनीती आखली आहे.
भाजपचे ‘स्टार’ प्रचारक : उत्तर भारतीय मतदारांवर लक्ष
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत प्रामुख्याने उत्तर भारतीय चेहरे आहेत. यामध्ये–
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
बिहारमधील आमदार व भोजपुरी गायिका मैथिली ठाकूर
भाजप खासदार व भोजपुरी अभिनेते मनोज तिवारी
भोजपुरी चित्रपटसृष्टीतील गायक-अभिनेता दिनेशलाल यादव ‘निरहुआ’
भाजप खासदार व अभिनेता रवी किशन
यापैकी अनेक चेहरे अलीकडेच बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही सक्रिय होते. त्यामुळे ‘बिहारमधील प्रचारकांचा मुंबई महापालिकेशी काय संबंध?’ असा सवाल उपस्थित केला जात आहे. मात्र भाजपची ही रणनीती मुंबईतील लोकसंख्येच्या वास्तवाशी थेट जोडलेली असल्याचे पक्षातील नेते सांगतात.
मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांचे वाढते महत्त्व
मुंबईत उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड येथून स्थलांतरित झालेले नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. उपलब्ध आकडेवारीनुसार-
मुंबईत सुमारे २५ लाख उत्तर भारतीय मतदार
३६ विधानसभा मतदारसंघांपैकी २२ मतदारसंघांत उत्तर भारतीय मतं निर्णायक
एकट्या बिहारमधून सुमारे १८ लाख स्थलांतरित मतदार
कलिना, कुर्ला, दहिसर, चारकोप, कांदिवली (पूर्व), बोरिवली, मागाठणे, वर्सोवा, गोरेगाव, दिंडोशी, जोगेश्वरी (पूर्व), अंधेरी (पूर्व) या भागांत उत्तर भारतीय मतदार बहुसंख्य आहेत. तसेच मीरा-भाईंदर, वसई-विरार आणि भिवंडी महापालिकांमध्येही हीच स्थिती आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, उत्तर भारतीय मतदार सहसा स्थानिक मुद्द्यांपेक्षा राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्व आणि पक्षाला प्राधान्य देतात. याच गणितावर भाजपने प्रचाराची दिशा निश्चित केल्याचे मानले जाते.
मुंबईची भाषिक रचना : मराठी अल्पमतात?
मुंबईतील भाषिक लोकसंख्येचा विचार केला असता पुढील चित्र समोर येते-
मराठी – ३५.९६ टक्के
हिंदी – २२.९८ टक्के
उर्दू – १३.५३ टक्के
गुजराती – ११.३४ टक्के
तमिळ – २.४ टक्के
यावरून मुंबईत सुमारे ६० टक्के अमराठी मतदार असल्याचे स्पष्ट होते. याच वास्तवाचा आधार घेत ठाकरे बंधू मराठी मतदारांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत, तर भाजपने उत्तर भारतीय मतांचे संघटन करण्याचा मार्ग स्वीकारला आहे.
राजकीय संघर्षाला धार
निवडणूक बिगुल अधिकृतपणे वाजण्याआधीच मराठी-अमराठी मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना भवनासमोर उत्तर भारतीयांना एकत्र येण्याचे आवाहन करणारी पोस्टर्स लागल्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केलेले वक्तव्यही चर्चेचा विषय ठरले.
दरम्यान, शिवसेनेकडून अभिनेता गोविंदा यांना प्रचारात उतरवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची लढत न राहता, भाषिक अस्मिता, स्थलांतर आणि राजकीय ध्रुवीकरण यांचा कस पाहणारी निवडणूक ठरण्याची चिन्हे आहेत.
उत्तर भारतीय ‘स्टार’ प्रचारकांची ही भैय्यागर्दी भाजपसाठी कितपत फायदेशीर ठरते, की मराठी अस्मितेचा मुद्दा निर्णायक ठरतो, याचा निकाल मतपेटीतूनच समोर येणार आहे.


