मुंबई प्रतिनिधी
रत्नागिरी–नागपूर महामार्गातील अंकली ते चोकाक या टप्प्यात संपादित होणाऱ्या जमिनींसाठी बाधित शेतकऱ्यांना चौपट दराने नुकसानभरपाई देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर या निर्णयाला मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.
या टप्प्यातील शेतजमिनींसाठी यापूर्वी दुप्पट दरानेच मोबदला देण्याचा प्रस्ताव होता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती. अन्य टप्प्यांतील शेतकऱ्यांना चौपट दराने मोबदला मिळत असताना केवळ ३३ किलोमीटरच्या या पट्ट्यातील शेतकऱ्यांना कमी दराचा मोबदला मंजूर करण्यात आल्याचा आरोप ग्रामीण भागातून करण्यात येत होता.
या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांकडून गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा व आंदोलनाचा पवित्रा ठेवण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि भारतीय किसान संघ यांच्या पुढाकारातून या प्रश्नावर एकत्रित भूमिका मांडण्यात आली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी हमी दिली होती.
नव्या मंजुरीनुसार दुप्पट दराने मिळणारा सुमारे ९४ कोटी रुपयांचा मोबदला वाढून आता १७१ कोटी रुपयांवर जाईल. या निर्णयामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून महामार्गाच्या कामालाही गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शासनाच्या दुटप्पी धोरणाचा आरोप करीत शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबल्यानंतर अखेर शासनाने भूमिका बदलत समान न्याय देण्याचा निर्णय घेतल्याचे शेतकरी संघटनांनी नमूद केले आहे. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.


