मुंबई प्रतिनिधी
मुंबई महापालिका निवडणुका जवळ येत असताना उमेदवारांच्या अर्ज विक्री प्रक्रियेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. मंगळवार, 23 डिसेंबरपासून सुरू झालेल्या अर्ज विक्री आणि सादरीकरण प्रक्रियेच्या पहिल्या दोन दिवसांत तब्बल सात हजारांहून अधिक अर्जांची विक्री झाली आहे.
पहिल्याच दिवशी 4 हजार 165 अर्जांची विक्री झाली, तर दुसऱ्या दिवशी 2 हजार 844 अर्ज विकले गेले. त्यामुळे दोन दिवसांत अर्ज विक्रीचा आकडा सात हजारांच्या पुढे गेला आहे. उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे अनेक निवडणूक कार्यालयांबाहेर सकाळपासूनच रांगा लागल्याचे चित्र दिसून आले.
२३ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून अर्जांची विक्री
मुंबईत उमेदवारी अर्ज विक्री आणि स्वीकृतीसाठी 23 निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालये कार्यान्वित करण्यात आली आहेत. प्रत्येक वॉर्डमध्ये वेगळे कक्ष उभारण्यात आले असून जाती-प्रवर्गनिहाय अर्ज स्वीकृतीची व्यवस्था करण्यात आली आहे.
पालिकेच्या अधिकाऱ्यांनी अर्ज प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी विशेष नियोजन केले असून, अर्ज स्वीकारण्यासाठी सहाय्यक कर्मचारी आणि मार्गदर्शन कक्ष नियुक्त करण्यात आले आहेत. उमेदवारांना २९ डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे.
अर्ज सादरीकरणाचा वेग मात्र संथ
अर्ज विक्रीला मोठा प्रतिसाद मिळत असला तरी अर्ज सादर करण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नव्हता. दुसऱ्या दिवशी केवळ दोन अर्ज सादर करण्यात आले त्यापैकी ‘एन’ विभाग (घाटकोपर) आणि ‘के’ पश्चिम विभाग (अंधेरी) येथील प्रत्येकी एका उमेदवाराचा समावेश आहे.
प्रशासनाच्या मते, अनेक उमेदवार अंतिम क्षणी अर्ज सादर करण्याची पद्धत कायम असल्याने शेवटच्या दिवसांत अर्जस्वीकृती केंद्रांवर अधिक गर्दी वाढण्याची शक्यता आहे.
२५ डिसेंबरला प्रक्रिया बंद
नाताळ सणानिमित्त २५ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे त्या दिवशी अर्ज विक्री आणि स्वीकृती प्रक्रिया बंद राहील. त्यानंतरची काही दिवसांची मुदत महत्त्वाची ठरणार असून, उमेदवारांच्या हालचालींना यामुळे अधिक वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबई महापालिका निवडणूक जवळ येत असताना शहरातील राजकीय वातावरणात उत्सुकता आणि स्पर्धा अधिक तीव्र होताना दिसत आहे.


