मुंबई, प्रतिनिधी
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला मास्टर प्रशिक्षण कार्यक्रम (प्रशिक्षकांचे प्रशिक्षण) यशस्वीपणे पार पडला. भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन कक्ष सभागृह येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या प्रशिक्षण कार्यक्रमास अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवार तसेच विशेष कार्य अधिकारी (अतिक्रमण निर्मूलन, म्हाडा) संदीप कळंबे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आगामी निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय व नियमबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी या प्रशिक्षणात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः ईव्हीएम यंत्रांची हाताळणी, त्यांची सुरक्षितता, मतदान साहित्याची योग्य व्यवस्था, मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांची जबाबदारी, तसेच मतदानाच्या प्रत्येक टप्प्यावर करावयाच्या कामकाजाची सखोल माहिती देण्यात आली.

याशिवाय मतदानपूर्व चाचणी मतदान (मॉक पोल), मतदानपूर्व नियोजन, मतदार ओळखपत्रांची तपासणी, ईव्हीएम यंत्र सील करण्याची प्रक्रिया आणि मतदानादरम्यान पाळावयाच्या निवडणूक नियमावलीवर विशेष भर देण्यात आला. मतदान प्रक्रियेत कोणतीही चूक अथवा गोंधळ होऊ नये, यासाठी आवश्यक दक्षता कशी घ्यावी, याबाबतही उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षणादरम्यान मान्यवरांनी निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचा कणा असल्याचे नमूद करत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी पूर्ण निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडावी, असे आवाहन केले. अशा प्रकारच्या प्रशिक्षणामुळे निवडणूक यंत्रणा अधिक सक्षम व कार्यक्षम होत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने हे मास्टर प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरले असून, आगामी टप्प्यांमध्येही अशाच स्वरूपाचे मार्गदर्शनात्मक कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.


