नाशिक प्रतिनिधी
राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना भाजपमध्ये सुरू असलेल्या पक्षप्रवेशाच्या राजकारणावरून नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. नाशिकमध्ये झालेल्या एका पक्षप्रवेश कार्यक्रमादरम्यान भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली असून त्यांना भावनाही अनावर झाल्या.
ठाकरे गटाचे नेते विनायक पांडे आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक शाहू खैरे यांच्या भाजप प्रवेशानंतर फरांदे यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया देत म्हटले
“माझ्या डोळ्यासमोर कार्यकर्त्यांचा बळी दिला जात असेल, तर ते योग्य नाही. मी पक्षनिष्ठ कार्यकर्ती आहे; पण निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विचार झाला पाहिजे.”
फरांदे पुढे म्हणाल्या की, गेल्या चाळीस वर्षांत स्वतःवर अन्याय झाला, तरी कधी तक्रार केली नाही; मात्र पक्षातील साध्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची खंत असल्याने भावनिक झाल्याचे त्या म्हणाल्या.
पक्षप्रवेशाचे स्वागत करतानाही त्यांनी कार्यक्रमाची पद्धत योग्य वाटली नसल्याचे स्पष्ट केले.
“आज पक्षात आलेल्या नेत्यांचे स्वागत आहे; पण आज जे घडले, ते मला पटले नाही,” असे त्यांनी सांगितले.
या प्रकरणात काहींनी स्वार्थापोटी राजकारण केल्याचा आरोपही फरांदे यांनी नामोल्लेख न करता केला.
“काही दलाल आणि स्वार्थी लोकांनी घरात तिकीट मिळावे म्हणून वातावरण तयार केले. गिरीश महाजन यांच्यावर मी नाराज नाही; त्यांना चुकीचे ब्रिफिंग झाले,” असे त्यांनी नमूद केले.
पक्षप्रवेशामुळे पक्ष विस्तारतो, याला विरोध नसल्याचे सांगत त्यांनी मात्र एक मुद्दा अधोरेखित केला
“पक्ष मोठा होत असताना निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होता कामा नये. हा विषय मी वरिष्ठांपर्यंत पोहोचवणार आहे.”
गिरीश महाजन यांच्याशी चर्चा झाल्याचा उल्लेख करत त्या म्हणाल्या
“प्रवेश झाला असला, तरी तिकीट अंतिम झालेले नाही,” अशी माहिती महाजन यांनी दिल्याचे त्या म्हणाल्या.
नाशिकमधील या घडामोडींमुळे भाजपमधील ‘आयाराम-गयाराम’ संस्कृतीवर पुन्हा चर्चा रंगू लागली असून तळागाळातील कार्यकर्त्यांच्या नाराजीला त्यातून वाचा फोडली गेल्याचे निरीक्षण व्यक्त केले जात आहे.


