मुंबई प्रतिनिधी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील संभाव्य युतीबाबत सुरू असलेल्या चर्चांना अखेर अधिकृत स्वरूप मिळणार आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील युतीची घोषणा उद्या, बुधवार (दि. २४) रोजी दुपारी १२ वाजता केली जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
उद्या
१२ वाजता pic.twitter.com/ob47tQxhGG— Sanjay Raut (@rautsanjay61) December 23, 2025
गेल्या काही आठवड्यांपासून आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी, नेत्यांच्या चर्चा आणि जागावाटपाबाबतच्या बैठका सुरू होत्या. युतीची घोषणा नेमकी कधी होणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर केलेल्या ट्विटमुळे चर्चांना विराम मिळाला आहे.
संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) खात्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्रित फोटो शेअर केला आहे. या छायाचित्रात राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांना पुष्पगुच्छ देताना दिसत आहेत. या फोटोला “उद्या १२ वाजता” असे सूचक कॅप्शन देण्यात आले आहे. यावरून बुधवारी दुपारी ठाकरे बंधू संयुक्तपणे युतीची घोषणा करणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान, मनसे आणि शिवसेना (उबाठा) नेत्यांमध्ये जागावाटपाबाबत चर्चा पूर्ण झाल्याची माहिती आहे. त्यामुळे युतीबरोबरच जागावाटपाबाबतची रूपरेषाही उद्या जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याआधी पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी, “युती प्रत्यक्षात आधीच झाली असून केवळ जागावाटपाची औपचारिक घोषणा बाकी आहे. आमच्यात कोणताही विसंवाद नाही. वरळीतील डोममध्ये जेव्हा दोन भाऊ एकत्र आले, तेव्हाच युती झाली,” असे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता ट्विटद्वारे युतीच्या घोषणेचा मुहूर्त जाहीर करण्यात आल्याने मुंबईच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड ठरणार असल्याचे मानले जात आहे.


