मुंबई प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने प्रशासकीय पातळीवर फेरबदल सुरू ठेवले आहेत. त्याचाच भाग म्हणून सोमवारी (२२ डिसेंबर) तीन सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. या बदल्यांमध्ये ठाण्याची कन्या असलेल्या डॉ. कश्मीरा संखे यांची नाशिक जिल्ह्यात महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
नाशिकमध्ये डॉ. कश्मीरा संखे यांची वर्णी
२०२३ बॅचच्या आयएएस अधिकारी डॉ. कश्मीरा संखे यांची भंडारा जिल्ह्यातील तुमसर उपविभागातून बदली करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील कळवण उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे (आयटीडीपी) प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आदिवासीबहुल भागातील प्रशासन आणि विकासकामांची जबाबदारी त्यांच्याकडे असणार आहे.
नियोजन विभागाची धुरा शैला ए. यांच्याकडे
वरिष्ठ आयएएस अधिकारी शैला ए. (२००३ बॅच) यांचीही बदली करण्यात आली आहे. वित्त मंत्रालयात सचिव (वित्तीय सुधारणा) म्हणून कार्यरत असलेल्या शैला ए. यांची आता मंत्रालयातील नियोजन विभागाच्या सचिव आणि विकास आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या विकासात्मक धोरणे आणि नियोजन प्रक्रियेत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
गडचिरोलीत अरुण एम. यांची नियुक्ती
२०२३ बॅचचे आयएएस अधिकारी अरुण एम. यांची गडचिरोली जिल्ह्यातच बदली करण्यात आली आहे. यापूर्वी ते चामोर्शी उपविभागात कार्यरत होते. आता त्यांच्याकडे गडचिरोली उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी तसेच आयटीडीपीचे प्रकल्प अधिकारी म्हणून पदभार सोपवण्यात आला आहे.
राज्यातील प्रशासकीय यंत्रणेला अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने हे बदल करण्यात आल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


