मुंबई प्रतिनिधी
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचाली वेग घेत असतानाच शिवसेनेतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे तरुण, तडफदार आणि आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार विश्वास नांदेकर यांचे मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.
नांदेकर हे काही दिवसांपासून आजारी होते. गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांच्या देखरेखीखाली प्रकृती सुधारावी यासाठी प्रयत्न सुरू असतानाच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने यवतमाळ जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
नांदेकर यांच्या निधनाची माहिती मिळताच शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थकांनी तीव्र शोक व्यक्त केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १६ डिसेंबर रोजी रुग्णालयात जाऊन नांदेकर यांची भेट घेतली होती. त्या वेळी त्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत डॉक्टरांकडून उपचारांबाबत माहिती घेतली होती. त्या भेटीदरम्यान नांदेकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे स्पष्ट झाले होते.
विश्वास नांदेकर यांच्या निधनाने शिवसेनेने एक लढाऊ आणि लोकप्रिय नेतृत्व गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.


