
नवी दिल्ली : बिहारमधील गुन्हेगारांसाठी दहशतीचे नाव आणि चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेले आयपीएस शिवदीप लांडे यांनी त्यांच्या पोलिस सेवेचा राजीनामा दिला होता, जो आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला आहे. विशेष म्हणजे शिवदीप लांडे हे महाराष्ट्रातील आयपीएस अधिकारी आहेत. बिहारमध्ये सिंघम म्हणून ते परिचित होते.
राष्ट्रपती भवनाने अधिसूचना जारी केली आहे. बिहारच्या प्रशासकीय कॉरिडॉरमधून ही सर्वात मोठी बातमी आहे.
बिहार कॅडरचे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी १९ सप्टेंबर २०२४ रोजी सोशल मीडियावर राजीनामा देण्याची घोषणा केली होती. यानंतर हे प्रकरण बिहार सरकारकडे आणि नंतर केंद्राकडे गेले. आज राष्ट्रपती भवनाने याची पुष्टी केली आहे आणि त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. या राजीनाम्यानंतर त्यांनी आता बिहार सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
शिवदीप लांडे हे २००६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते पूर्णिया रेंजचे आयजी म्हणून कार्यरत होते. आपल्या कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणाने शिवदीप लांडे यांनी राज्यात एक मजबूत अधिकारी म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. बिहारमध्ये ते ‘सिंघम’ म्हणून ओळखला जातात आणि लोकांमध्ये ते खूप प्रसिद्ध आहेत.