यवतमाळ प्रतिनिधी
यवतमाळ : कर्तव्य बजावत असतानाच हृदयविकाराचा झटका आल्याने मारेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक उमेश बेसरकर यांचे निधन झाले. त्यांच्या अकस्मात जाण्याने यवतमाळ जिल्हा पोलीस दलात आणि स्थानिक नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे. नुकतेच १४ जून रोजीच त्यांची पुसद येथून मारेगाव येथे बदली झाली होती.
बैलपोळा सणादिवशी मारेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून बेसरकर यांनी स्वतः बंदोबस्ताची धुरा हाती घेतली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी छातीत दुखू लागल्याने त्यांना तातडीने वणी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच तीव्र झटका आल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मूळचे नागपूरचे असलेले बेसरकर हे कार्यतत्पर आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जात.
बेसरकर यांच्या निधनाने मारेगाव बाजारपेठेत सन्नाटा पसरला. सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना हृदयपूर्वक श्रद्धांजली वाहिली. “कर्तव्याशी प्रामाणिक राहणारा अधिकारी गमावल्याची” भावना पोलीस दलाने व्यक्त केली आहे.
पोलिसांवर वाढता ताण : आरोग्याची तपासणी आवश्यक
बेसरकर यांच्या जाण्याने एक प्रश्न पुन्हा समोर आला आहे — आपल्या पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी यांच्यावरचा ताण आणि आरोग्याचा प्रश्न. अखंड ड्युटी, सणासुदीच्या काळातील दिवस-रात्र बंदोबस्त, कधी कायदा-सुव्यवस्थेचा ताण, तर कधी गुन्हेगारीवर नियंत्रण… या सगळ्यात पोलिसांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्षच होते.
आरोग्य तपासणी ही फक्त कागदोपत्री न राहता नियमित वैद्यकीय शिबिरे, हृदयविकार व ताणतणाव तपासणी, मानसिक समुपदेशन अशा पद्धतीने प्रत्यक्षात उतरवण्याची मागणी यापूर्वीही करण्यात आली आहे. बेसरकर यांच्या अकस्मात जाण्याने या मागणीकडे सरकार आणि पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे अत्यावश्यक ठरते.
एका कार्यतत्पर, जनसंपर्क ठेवणाऱ्या अधिकाऱ्याचे आयुष्य इतक्या अचानक थांबणे हा केवळ वैयक्तिक शोक नाही, तर पोलिसांच्या आरोग्य सुरक्षेकडे वेळीच लक्ष न दिल्यास संपूर्ण यंत्रणेवर होणाऱ्या परिणामाचा इशारा आहे.


