
यवतमाळ प्रतिनिधी
राज्यात दिवाळीचा आनंद आणि रोषणाई ओसंडून वाहत असतानाच विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात पुन्हा एकदा आत्महत्यांच्या घटनांनी शेतकरी जगत हादरले आहे. केवळ दोन दिवसांत कळंब, बाभूळगाव आणि दारव्हा तालुक्यात तिघा शेतकऱ्यांनी आर्थिक विवंचनेतून टोकाचे पाऊल उचलल्याने ग्रामिण भागात हळहळ व्यक्त होत आहे.
कळंब तालुक्यातील तिरझडा गावातील सुभाष वसंत ठुसे (३५) या अल्पभूधारक शेतकऱ्याने १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ग्रामपंचायतीच्या विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेतातील सोयाबीन व कपाशीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यातच वाढते कर्ज, पिकांचा खर्च आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे ठुसे हे प्रचंड ताणाखाली होते. अखेर नैराश्याच्या भरात त्यांनी आत्महत्या केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
तशीच दुसरी घटना बाभूळगाव तालुक्यातील हस्तापूर गावात १९ ऑक्टोबर रोजी घडली. हरिदास झिंगूजी शिवरकर (६०) यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीला कंटाळून विष प्राशन केले. कुटुंबाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह बाभूळगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला.
तर दारव्हा तालुक्यातील लोही गावातील नितीन चव्हाण या शेतकऱ्यानेही त्याच दिवशी आत्महत्या केली. कर्ज आणि उसनवारीवर पेरणी केलेली, पण अतिवृष्टीने सर्व स्वप्ने उद्ध्वस्त केली. मिळकतीचा थांगपत्ता नाही, आणि परतफेडीची चिंता डोक्यावर. या विवंचनेत चव्हाण यांनी कीटकनाशक प्राशन करून जीवन संपवले.
यवतमाळ जिल्ह्यातील या सलग आत्महत्यांनी पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला आहे, ‘शेतकरी मदतीच्या आशेने किती दिवस जगणार? शासनाकडून मदतीच्या घोषणा होत असल्या तरी प्रत्यक्षात मिळणारी रक्कम झालेल्या नुकसानीच्या तुलनेत ‘तोकडी’ असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.
दिवाळीच्या उजेडातही यवतमाळच्या या शेतकऱ्यांच्या घरात मात्र काळोख पसरला आहे.