मुंबई प्रतिनिधी
राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी (15 डिसेंबर) मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून, दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी केली जाणार आहे. घोषणेसोबतच संबंधित सर्व महापालिकांमध्ये आदर्श आचारसंहिता तात्काळ लागू झाली आहे.

आयोगाचे आयुक्त वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बृहन्मुंबई महापालिकेत एक-सदस्यीय प्रभाग पद्धत लागू असून मतदारांना एकच मत द्यावे लागेल. उर्वरित 28 महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना असून बहुतांश ठिकाणी एका प्रभागातून चार सदस्य निवडले जाणार आहेत. काही प्रभागांमध्ये पाच तर काही ठिकाणी तीन सदस्य असतील. त्यामुळे या महापालिकांतील मतदारांना एका प्रभागात साधारणतः तीन ते पाच मते द्यावी लागतील.
1 जुलै 2025 ची मतदार यादी ग्राह्य
या निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 रोजीची मतदार यादी ग्राह्य धरण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. मतदार यादीत दुबार नावे आढळलेल्या मतदारांच्या नावासमोर ‘डबल स्टार’ चिन्ह देण्यात येणार आहे. अशा मतदारांना कोणत्याही एका मतदान केंद्रावर मतदान करता येईल. संभाव्य दुबार मतदारांच्या घरी प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. मुंबईत एकूण 10,111 मतदान केंद्रे असतील, अशी माहिती आयोगाने दिली.
2869 जागांसाठी लढत
मुंबईसह 29 महापालिकांतील एकूण 2,869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यामध्ये महिलांसाठी 1,442 जागा आरक्षित आहेत. त्यात अनुसूचित जातींसाठी 341, अनुसूचित जमातींसाठी 77 आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गातील 759 महिलांचा समावेश आहे.
निवडणुकीशी संबंधित ठळक मुद्दे
सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक
राज्यभरात सुमारे 3 कोटी 48 लाख मतदार
1 जुलै 2025 ची मतदार यादी ग्राह्य
मुंबईत 10,111 मतदान केंद्रे
संभाव्य दुबार मतदारांच्या नावासमोर ‘*’ चिन्ह
बृहन्मुंबई महापालिकेत सुमारे 11 लाख दुबार मतदार
एकूण मतदान केंद्रे – 39,147
महत्त्वाच्या तारखा
नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी : 23 ते 30 डिसेंबर 2025
नामनिर्देशन पत्रांची छाननी : 31 डिसेंबर 2025
उमेदवारी माघारीची अंतिम मुदत : 2 जानेवारी 2026
निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी : 3 जानेवारी 2026
मतदान : 15 जानेवारी 2026
मतमोजणी : 16 जानेवारी 2026
ज्या 29 महापालिकांमध्ये निवडणूक होणार आहे (जागा)
1. बृहन्मुंबई – 227
2. भिवंडी-निजामपूर – 90
3. नागपूर – 151
4. पुणे – 162
5. ठाणे – 131
6. अहमदनगर – 68
7. नाशिक – 122
8. पिंपरी-चिंचवड – 128
9. औरंगाबाद – 113
10. वसई-विरार – 115
11. कल्याण-डोंबिवली – 122
12. नवी मुंबई – 111
13. अकोला – 80
14. अमरावती – 87
15. लातूर – 70
16. नांदेड-वाघाळा – 81
17. मीरा-भाईंदर – 96
18. उल्हासनगर – 78
19. चंद्रपूर – 66
20. धुळे – 74
21. जळगाव – 75
22. मालेगाव – 84
23. कोल्हापूर – 92
24. सांगली-मिरज-कुपवाड – 78
25. सोलापूर – 113
26. इचलकरंजी – 76
27. जालना – 65
28. पनवेल – 78
29. परभणी – 65
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभाराला दिशा देणाऱ्या या निवडणुकांकडे राजकीय पक्षांसह नागरिकांचेही लक्ष लागले आहे.


