मुंबई प्रतिनिधी
मुंबई : दहिसर येथील ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम व आमदार प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत वसंत स्मृती, मुंबई येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
भाजपात प्रवेश केल्यानंतर तेजस्वी घोसाळकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “खूप काही गोष्टी आहेत ज्या मला बोलता येत नाहीत. हा निर्णय माझ्यासाठी अत्यंत कठीण आहे. ज्यांनी मला ओळख दिली तो पक्ष सोडताना मनाला वेदना होत आहेत. मात्र माझ्या प्रभागातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला.”
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाची कामे होतील, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआय तपासाला गती देऊन कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. पक्ष जे काम सोपवेल ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेन, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ११ वर्षांच्या कार्यकाळातील देशाचा विकास, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य व विशेषतः मुंबई शहराचा झालेला कायापालट यामुळे तेजस्वी घोसाळकर प्रभावित झाल्या आहेत. अटल सेतू, कोस्टल रोड, बीडीडी चाळींचा पुनर्विकास, मेट्रो, सीसीटीव्ही यांसारख्या प्रकल्पांमुळे मुंबई अधिक सुरक्षित व विकसित झाली असून हिंदुत्वाच्या विचारांशी बांधील राहून त्यांनी भाजपात प्रवेश केल्याचे साटम यांनी सांगितले.
दरम्यान, पक्षप्रवेशापूर्वी तेजस्वी घोसाळकर यांनी शिवसैनिकांना भावनिक पत्र लिहिले होते. “माझ्या आयुष्यातील अंधाऱ्या काळात दिलेली साथ मी कधीही विसरणार नाही. अभिषेकच्या जाण्यानंतर समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणे आणि माझ्या मुलांची व सहकाऱ्यांची काळजी घेणे हेच माझे ध्येय आहे. बदलत्या परिस्थितीत घेतलेला हा निर्णय आपण समजून घ्याल,” अशी भावना त्यांनी पत्रातून व्यक्त केली.


