मुंबई प्रतिनिधी
राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने तयारीला वेग दिला आहे. येत्या काही दिवसांत निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असून, त्या अनुषंगाने आयोगाने आज सर्व महापालिका आयुक्तांना सविस्तर व महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. निवडणूक कार्यक्रम, आदर्श आचारसंहिता, उमेदवारी अर्ज भरणे व मागे घेणे, त्यासाठी लागणारी कागदपत्रे तसेच इतर सर्व बाबींबाबत पूर्वतयारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आयोगाने सर्व २९ महापालिकांना पाठवलेल्या पत्रात निवडणूक व्यवस्थापनाचा सविस्तर आराखडा नमूद करण्यात आला आहे. निवडणुकीशी संबंधित अधिकाऱ्यांचा आढावा घेऊन आयोगाच्या आदेशानुसार बदली किंवा पदस्थापना करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांना देण्यात आले आहेत.
मुंबई महापालिकेसाठी १० ते १२ प्रभागांमागे एक, तर इतर महापालिकांसाठी साधारणपणे तीन प्रभागांमागे एक आणि अपवादात्मक परिस्थितीत चार प्रभागांमागे एक, अशा प्रमाणात उपजिल्हाधिकारी दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिकाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासह इतर निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांबाबतही स्पष्ट सूचना करण्यात आल्या आहेत.
मतदान केंद्रांची संख्या निश्चित करून त्यानुसार आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून घेणे, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवा अधिग्रहित करणे आणि त्यांना आवश्यक प्रशिक्षण देणे, यावरही आयोगाने भर दिला आहे. उमेदवारी अर्ज, शपथपत्रे, विविध नमुने आणि माहितीपुस्तिका वेळेत तयार ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावरील मतदार संख्या आणि मतदारांसाठी आवश्यक सोयीसुविधांची पूर्तता करण्याबाबतही स्पष्ट निर्देश आहेत.
मतदान साहित्य, स्ट्राँग रूमची व्यवस्था, मतमोजणीसाठी आवश्यक उपाययोजना आणि निवडणुकीशी संबंधित अन्य साहित्य वेळेत उपलब्ध करून घेण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. तसेच आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच पोलीस विभाग, उत्पादन शुल्क विभाग आणि अन्य संबंधित विभागांनी प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने आयुक्तांना सज्ज राहण्याचे निर्देश दिल्याने महापालिका निवडणुकांच्या तारखा लवकरच जाहीर होतील, अशी चिन्हे आहेत. सर्व महापालिकांमधील तयारीचा अंतिम आढावा घेतल्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार असल्याचे आयोगाकडून संकेत देण्यात आले आहेत.


