मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील गाजलेल्या BMW हिट-अँड-रन प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आरोपी मिहिर शाह यांना मोठा धक्का दिला आहे. एका महिलेचा मृत्यू आणि तिच्या पतीला गंभीर जखमी करणाऱ्या या प्रकरणात आरोपीच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट नकार दिला. अशा स्वरूपाच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये कठोर भूमिका आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती ए. जी. मसीह यांच्या खंडपीठासमोर हा अर्ज आला होता. या वेळी न्यायालयाने, समाजात चुकीचा संदेश जाणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. “अशा प्रकारच्या निष्काळजी आणि अमानुष कृत्यांना कोणतीही सवलत देता येणार नाही. संबंधित तरुणांना योग्य धडा शिकवणं आवश्यक आहे,” अशी परखड टिप्पणीही न्यायालयाने केली.
काय आहे प्रकरण?
७ जुलै २०२४ रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास वरळीतील अट्रिया मॉल परिसरात हा भीषण अपघात घडला. मिहिर शाह याने चालवलेल्या बीएमडब्ल्यू कारने मागून एका स्कूटरला जोरदार धडक दिली. या स्कूटरवर मच्छीमार दांपत्य कावेरी नाखवा आणि प्रदीप नाखवा होते. धडकेनंतर स्कूटर उलटली. प्रदीप नाखवा यांनी उडी मारून स्वतःचा जीव वाचवला; मात्र कावेरी नाखवा कारखाली अडकल्या.
धक्कादायक बाब म्हणजे, अपघातानंतरही आरोपीने वाहन थांबवले नाही. कावेरी नाखवा यांना कारखाली अडकवून तब्बल दीड किलोमीटर अंतर फरफटत नेण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर पळ काढण्याचा प्रयत्न
अपघातानंतर मिहिर शाह आणि त्याचा चालक राजऋषी बिदावत घटनास्थळावरून फरार झाले होते. चालक बिदावत याला त्याच दिवशी अटक करण्यात आली, तर मिहिर शाह याला दोन दिवसांनी, ९ जुलै रोजी ताब्यात घेण्यात आले. सध्या दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत.
उच्च न्यायालयाचा आधीच नकार
या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वीच मिहिर शाह यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. अपघाताच्या वेळी आरोपी प्रचंड मद्यधुंद अवस्थेत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते. वाहन न थांबवता पळून जाणे, चालकाची जागा बदलणे, वडिलांना फोन करणे आणि घटनास्थळ सोडणे, या सर्व कृतींमधून पुरावे नष्ट करण्याचा तसेच तपासावर परिणाम घडवून आणण्याचा प्रयत्न दिसतो, असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते.
बनावट ओळखपत्राचा आरोप
एक्साइज विभागाच्या चौकशीत अपघातापूर्वी मिहिर शाह आणि त्याचे मित्र एका पबमध्ये मद्यपान करत असल्याचे निष्पन्न झाले. पबच्या बिलांवरून मोठ्या प्रमाणात मद्यपान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, पब व्यवस्थापनाने मिहिर शाह यांनी खोट्या ओळखपत्राचा वापर केल्याचा आरोप केला आहे. ओळखपत्रात वय २७ वर्षे दाखवण्यात आले होते, प्रत्यक्षात आरोपी २४ वर्षांचा असून महाराष्ट्रात मद्यपानासाठी किमान वय २५ वर्षे आहे.
सर्वोच्च न्यायालयाची ठाम भूमिका
या सर्व पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास नकार देत कठोर भूमिका घेतली आहे. समाजात वाढत चाललेल्या अशा निष्काळजी आणि बेफिकीर कृत्यांना रोखण्यासाठी कठोर कारवाई गरजेची असल्याचा स्पष्ट संदेश न्यायालयाने दिला आहे.


