नाशिक प्रतिनिधी
गंगापूर रोडवरील गोवर्धन शिवार परिसरात घडलेल्या निर्घृण खून प्रकरणाची उकल नाशिक तालुका पोलिसांनी केली आहे. या प्रकरणात दोन संशयितांना अटक करण्यात आली असून, एकास बिहार तर दुसऱ्यास उत्तर प्रदेशातून ताब्यात घेण्यात आले आहे. खुनात वापरलेली दुचाकी, धारदार शस्त्र आणि रक्ताचे कपडे पोलिसांनी जप्त केले आहेत.
गोवर्धन शिवार येथील फाशीच्या डोंगराजवळ २९ नोव्हेंबर रोजी एका अनोळखी व्यक्तीचा धारदार शस्त्राने डोक्यावर, तोंडावर व पायांवर वार करून खून करण्यात आला होता. चेहऱ्यावर सुकलेले रक्त असल्याने मृतदेहाची ओळख पटवणे अवघड झाले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलिस अधिकारी वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ दोन तपास पथके तयार करण्यात आली. प्रभारी पोलिस निरीक्षक मृदुला नाईक यांनी घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची सखोल तपासणी केली.
एमआयडीसी परिसरातील विविध कंपन्यांकडे मृतदेहाचे छायाचित्र पाठविण्यात आल्यानंतर मृताची ओळख पटली. अरविंद उर्फ पप्पू पशुपतिनाथ पांडे (वय ४०, रा. सातपूर, मूळ रा. बिहार) असे मृताचे नाव निष्पन्न झाले.
तपासात पप्पू पांडे हा २८ नोव्हेंबर रोजी दारू दुकानात मद्यपान करताना दिसल्याची माहिती मिळाली. तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तो मंजय पंडित व धर्मेंद्र पंडित यांच्यासोबत दुचाकीवरून जाताना दिसून आला. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मंजय पंडित यास बिहार येथून अटक केली. त्याच्याकडून खुनात वापरलेला चाकू, दुचाकी व रक्ताने माखलेले कपडे जप्त करण्यात आले.
अधिक चौकशीत मुख्य संशयित धर्मेंद्र शिवनारायण प्रजापती (वय २६, मूळ रा. रायपूर, जि. सारण, बिहार) हा वृंदावन (उत्तर प्रदेश) येथे लपून बसल्याची माहिती मिळाली. वरिष्ठांच्या आदेशानुसार स्वतंत्र पथक पाठवून त्यास ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलिस अधीक्षक अदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी वासुदेव देसले, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र मगर तसेच नाशिक तालुका पोलिस ठाण्याच्या प्रभारी निरीक्षक मृदुला नाईक, सहायक पोलिस निरीक्षक दीपक बिरारी व त्यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी बजावली.


