नाशिक प्रतिनिधी
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. या प्रकरणानंतर पीडित बालिकेच्या २३ वर्षीय आईने आतापर्यंत तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती विधानसभेत समोर आली. नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित केला.
१६ नोव्हेंबर रोजी डोंगराळे गावातील २४ वर्षीय विजय संजय खैरनार याने तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून दगडाने डोके ठेचत तिची हत्या केल्याचा आरोप आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह झुडपात फेकून देण्यात आला. मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपी पोलिसांसोबत शोधमोहीमेत सहभागी झाल्याचेही तपासात उघड झाले. मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी त्याच दिवशी आरोपीला अटक केली.
लक्षवेधी मांडताना आमदार सुहास कांदे चांगलेच आक्रमक झाले. “मी स्वतः मुलीचा बाप आहे. इथे बसलेला प्रत्येक जण मुलीचा बाप आहे. तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिचा खून करायचा, मृतदेह झुडपात फेकून द्यायचा आणि नंतर पोलिसांसोबत ताठ मानेने फिरायचे, या राज्यात कायद्याची भीती राहिली नाही का?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. पीडित कुटुंब अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जगत असून आई मानसिकदृष्ट्या कोलमडली असल्याचेही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
या प्रकरणात आरोपीला तातडीने फाशीची शिक्षा द्यावी, खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवावा, अशी ठाम मागणी आमदार कांदे यांनी केली.
या लक्षवेधीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचार आणि हत्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची कबुली दिली. “मालेगावच्या डोंगराळे येथील घटना अतिशय गंभीर आहे. मुख्यमंत्री आणि सरकार या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत असून खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा, फाशी देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणामुळे पुन्हा एकदा राज्यातील महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून कठोर कायदेशीर कारवाईची मागणी जोर धरत आहे.


