संगमनेर प्रतिनिधी
आष्वी खुर्द (ता. संगमनेर) येथील प्रशासन सेवेतून उंच भरारी घेतलेले अधिकारी डॉ. वसंत गोपाळ माने यांची महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास व बहुजन कल्याण विभागात उपसचिवपदी पदोन्नती झाली आहे. सामान्य प्रशासन विभागाने ८ डिसेंबर २०२५ रोजी काढलेल्या आदेशानुसार ही पदोन्नती जाहीर करण्यात आली असून, संगमनेर तालुका आणि पंचक्रोशीतून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेत २००९ मध्ये यश मिळवून डॉ. माने यांनी प्रशासकीय सेवेत प्रवेश केला. त्यानंतर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, ग्रामविकास विभाग, वन विभाग आदी ठिकाणी विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत त्यांनी प्रशासकीय कामकाजात ठसा उमटवला. २०११ ते २०१६ या कालावधीत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात उल्लेखनीय कामगिरी केली. त्यानंतर २०१७ ते २०१८ दरम्यान ग्रामविकास विभागात वर्ग अधिकारी म्हणून, २०१९ ते २०२३ या कालावधीत पदोन्नतीने अवर सचिव म्हणून त्यांनी प्रभावीपणे काम पाहिले.
डॉ. माने यांच्या प्रामाणिक सेवाभावाची, प्रशासकीय कौशल्याची आणि लोकहिताच्या निर्णयक्षमतेची दखल घेत शासनाने त्यांची उपसचिवपदी पदोन्नती केली आहे. या यशाबद्दल राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी, ग्रामस्थ, विद्यार्थी आणि तरुणांनी अभिनंदन केले आहे.
आष्वी खुर्दसारख्या ग्रामीण भागातून आलेल्या अधिकाऱ्याने राज्य प्रशासनाच्या उच्च पातळीवर मजल मारणे हे पंचक्रोशीत अभिमानास्पद मानले जात असून, त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


