लखनौ:
पोलीस खात्यातील शिस्त, नियम आणि प्रामाणिकपणाचा आग्रह प्रत्यक्षात किती पोकळ ठरू शकतो, याचे धक्कादायक उदाहरण लखनौमध्ये समोर आले आहे. अवघ्या ४० हजार रुपयांच्या मासिक पगारावर असलेल्या एका कॉन्स्टेबलकडे तब्बल पाच कोटी रुपयांची आलिशान मालमत्ता पाहून अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनाही क्षणभर शब्द सुचेनात.
कफ सिरपच्या बेकायदेशीर व्यापारात अडकलेला आणि सेवेतून बडतर्फ करण्यात आलेला आलोक प्रताप सिंग याच्या लखनौमधील बंगल्यावर टाकण्यात आलेल्या छाप्यात ही श्रीमंती उघडकीस आली. साधा पोलीस कॉन्स्टेबल म्हणून ओळख असलेला हा व्यक्ती प्रत्यक्षात अत्यंत ऐषआरामी जीवन जगत असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.
लखनौ–सुलतानपूर महामार्गालगत सुमारे सात हजार चौरस फुटांच्या जागेत उभारलेला हा दोन मजली बंगला म्हणजे दिखाऊ संपत्तीचे प्रतीकच. युरोपियन धाटणीची अंतर्गत सजावट, गोलाकार जिने, उंच खांब, रुंद बाल्कनी, कोरीव कठडे आणि जुन्या शैलीतील प्रकाशयोजना पाहून तपास यंत्रणांचेही डोळे दिपले. प्राथमिक अंदाजानुसार, केवळ अंतर्गत सजावटीसाठीच दीड ते दोन कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून, संपूर्ण बांधकामाची किंमत पाच कोटींच्या आसपास असल्याचे सांगितले जाते.
छाप्यादरम्यान प्राडा, गुच्ची यांसारख्या नामांकित आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या हँडबॅग्ज, राडोसारखी प्रीमियम घड्याळे, महागडी इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि इतर लक्झरी वस्तूंचा मोठा साठा जप्त करण्यात आला. एका बाजूला पोलिस खात्याचा गणवेश परिधान करून कायद्याचे रक्षण करायचे आणि दुसऱ्या बाजूला काळ्या पैशातून ऐषआराम उभारायचा—हा दुटप्पीपणा तपास अधिकाऱ्यांच्या जिव्हारी लागलेला आहे. सरकारमान्य मूल्यांकन अधिकाऱ्याच्या माध्यमातून या संपत्तीचा नेमका हिशोब लावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष कृती दलाने (एसटीएफ) आलोक प्रताप सिंगला अटक केली आहे. कफ सिरप रॅकेटच्या तपासात त्याचे नाव पुढे आले. त्याची कारकीर्दही वादांनीच व्यापलेली होती. २००६ साली चार किलो सोन्याच्या लुटीप्रकरणी त्याच्यावर आरोप झाले होते आणि तेव्हा त्याला सेवेतून काढून टाकण्यात आले होते. नंतर निर्दोष ठरल्यानंतर त्याची पुन्हा नियुक्ती झाली; मात्र २०१९ मध्ये पुन्हा आरोपांमुळे त्याची बडतर्फी करण्यात आली. त्यानंतर सुरू केलेल्या ‘व्यवसायाचे’ धागेदोरे पुढे कफ सिरपच्या काळ्या धंद्याशी जोडले गेले, असा तपास यंत्रणांचा आरोप आहे.
तपासात असेही समोर आले आहे की, चंदौली, गाझीपूर, जौनपूर आणि वाराणसी जिल्ह्यांतील तरुणांना हाताशी धरून त्याने बेकायदेशीर जाळे उभे केले होते. पोलिस व राजकीय ओळखींचा गैरवापर करून साठवणूक आणि पुरवठा सुरळीत चालवला जात असल्याचा संशय तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
हे प्रकरण केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित नसून, कोडीनयुक्त कफ सिरपच्या मोठ्या रॅकेटकडे निर्देश करणारे आहे. या प्रकरणात आतापर्यंत सुमारे साडेतीन लाख बाटल्या जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत साडेचार कोटी रुपयांच्या आसपास आहे. ३२ जणांना अटक झाली असून, शेकडो आस्थापनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्याच्यावर होती, तोच व्यक्ती कायद्याला हरताळ फासून कोट्यवधींची संपत्ती उभारत असेल, तर तो केवळ गुन्हा नाही; तो संपूर्ण व्यवस्थेवर उपस्थित होणारा गंभीर प्रश्न आहे. आलोक प्रताप सिंगचा हा उघडकीस आलेला ‘प्राडा-प्रकरणी’ चेहरा पोलिस यंत्रणेसाठीही आरसा ठरणारा आहे.


