छत्तीसगड:
छत्तीसगडमधील नामांकित हॉटेल व्यावसायिक दीपक टंडन यांनी दंतेवाडा जिल्ह्यात कार्यरत असलेल्या २०१७ बॅचच्या डीएसपी कल्पना वर्मा यांच्यावर खंडणी, फसवणूक, ब्लॅकमेलिंग आणि भावनिक छळाचे गंभीर आरोप केल्यानंतर राज्यातील पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
व्यावसायिक दीपक टंडन आणि डीएसपी वर्मा यांची पहिली भेट २०२१ मध्ये झाली. त्यानंतर ओळख वाढत प्रेमसंबंधांपर्यंत स्थिरावली, असा दावा टंडन यांनी केला आहे. चार वर्षे या नात्याचा गैरफायदा घेत विविध आमिषे दाखवून तब्बल कोट्यवधी रुपयांची पिळवणूक केल्याचा आरोप त्यांनी पोलिसांकडे नोंदवला आहे.

टंडन यांच्या म्हणण्यानुसार, या काळात डीएसपी वर्मा यांनी दोन कोटी रुपयांची रोकड, १२ लाखांची हिऱ्याची अंगठी, ५ लाखांचे सोन्याचे दागिने, १ लाखाचे ब्रासलेट तसेच इनोव्हा क्रिस्टा गाडी घेतली. याशिवाय रायपूरच्या व्हीआयपी रोडवरील त्यांचे एक हॉटेल वर्मा यांनी कथितरीत्या आपल्या भावाच्या नावावर करून घेतल्याचा आणि त्यानंतर जवळपास ३० लाख खर्चून स्वतःच्या नावावर घेतल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
“मागण्या न मानल्यास खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी,
टंडन यांनी पोलिसांना व्हॉट्सॲप चॅट्स, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर डिजिटल पुरावे दिल्याचे सांगितले. तथापि, हे प्रकरण आर्थिक वादाचे असल्याने दोन्ही पक्षांचे जबाब नोंदवूनही अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. “संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
डीएसपी कल्पना वर्मांचा आरोपांना ठाम प्रतिवाद
डीएसपी वर्मा यांनी सर्व आरोप फेटाळले असून, “दीपक टंडन यांच्याशी आर्थिक व्यवहारातून निर्माण झालेल्या वादाचा गैरफायदा घेत माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.
हे प्रकरण न्यायालयातही गेले होते आणि न्यायालयीन प्रक्रियेपासून वाचण्यासाठी जाणूनबुजून आपले नाव प्रकरणाशी जोडले जात असल्याचा आरोपही वर्मा यांनी केला.

“माझ्या कामाशी किंवा वैयक्तिक आयुष्याशी संबंध नसलेल्या वादात माझे फोटो आणि चुकीची माहिती व्हायरल करून माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहेत,” असेही वर्मा यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, दोन्ही बाजूंनी केलेले दावे आणि प्रतिदावे लक्षात घेता हा वाद आणखी कोणत्या वळणावर जातो याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.


