जुन्नर प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर पार पडलेल्या राज्यस्तरीय सोहळ्यात राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतरचे पहिले शासकीय भाषण केले. पती व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर आलेल्या जबाबदारीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवरायांच्या साक्षीने जनतेला “शब्द” देत सामाजिक न्यायाच्या विचारधारेप्रती निष्ठा व्यक्त केली.
शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ला येथे आयोजित प्रमुख शासकीय कार्यक्रमात राज्यातील मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि हजारो शिवभक्त उपस्थित होते. याच ठिकाणी अजित पवारांनी अनेकदा भाषणे केली होती, याची आठवण करून देताना सुनेत्रा पवार भावूक झाल्या. काही क्षण आवाज दाटून आला तरी त्यांनी संयम राखत कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.
जिजाऊंच्या प्रेरणेचा उल्लेख
भाषणाच्या प्रारंभी त्यांनी शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई व शिवजन्मभूमीची अधिष्ठात्री आई शिवाई देवी यांना वंदन केले. “मी नुकतीच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्या कठीण क्षणी माझ्या डोळ्यांसमोर जिजाऊ माँसाहेब उभ्या होत्या. त्यांनी केवळ शिवरायांना जन्म दिला नाही, तर स्वराज्याचा ध्यास आणि संकटाशी दोन हात करण्याची जिद्द दिली. तीच आमची प्रेरणा आहे,” असे त्या म्हणाल्या.
“शिवरायांच्या जन्मभूमीवर बोलताना अंगावर काटा येतो. आपण सारे शिवरायांचे मावळे आहोत, ही भावना मनात आहे,” असे सांगत त्यांनी जनतेप्रती बांधिलकी व्यक्त केली.
“शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचारांचा वारसा सोडणार नाही”
पतीच्या राजकीय वाटचालीचा उल्लेख करताना त्या म्हणाल्या, “आदरणीय दादांनी आयुष्यभर ज्या शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचारांवर चालत जनसेवा केली, तोच वारसा मी कधीही सोडणार नाही, हा शब्द या पवित्र भूमीवर देते.”
अजित पवारांच्या शिवनेरी विकास उपक्रमांची आठवण करून देत त्यांनी सांगितले की, शिवनेरीसह आग्रा, संगमेश्वर, रायगड, वढू बुद्रुक येथे सुरू असलेल्या ऐतिहासिक स्मारक व सुशोभीकरण प्रकल्पांमुळे भावी पिढीला प्रेरणा मिळेल. “महायुती सरकार प्रत्येक घटकाची काळजी घेण्यासाठी कटिबद्ध आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
भावूक क्षण; उपस्थितांची दाद
भाषणादरम्यान अजित पवारांच्या आठवणीने सुनेत्रा पवार काही क्षण थांबल्या. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना धीर दिला. कार्यक्रमानंतर त्यांनी शिवनेरी परिसरातील विकासकामांचा आढावा घेतला व प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या.
राज्याच्या राजकारणात मोठ्या धक्क्यानंतर नेतृत्वाची सूत्रे स्वीकारलेल्या सुनेत्रा पवार यांनी शिवजयंतीच्या दिवशी शिवनेरीवरून दिलेला हा पहिला सार्वजनिक संदेश राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. त्यांच्या भाषणातून भावनिकता, वैचारिक निष्ठा आणि शासनकर्त्याची जबाबदारी यांचा संगम स्पष्टपणे दिसून आला.


