भुवनेश्वर :
परवानाधारक कोळसा विक्रेत्याकडून ३० हजार रुपयांची लाच घेताना ओडिशा खाण विभागातील उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याला दक्षता पथकाने रंगेहाथ पकडले. त्यानंतर करण्यात आलेल्या झडतीत संबंधित अधिकाऱ्याच्या निवासस्थानी तब्बल ४ कोटी रुपयांची रोकड आढळून आली. राज्याच्या दक्षता इतिहासातील ही सर्वाधिक रोकड जप्ती असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
#WATCH | Following apprehension of Sri Debabrata Mohanty, Deputy Director of Mines, Cuttack Circle, Cuttack, yesterday night for taking a bribe Rs.30,000 from a licensed coal vendor, simultaneous house searches were initiated by Odisha Vigilance at his residential flat, parental… pic.twitter.com/zlRRWm199z
— ANI (@ANI) February 25, 2026
दक्षता विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कटक परिमंडळात कार्यरत असलेल्या या अधिकाऱ्याने तक्रारदार कोळसा डेपो मालकाकडून व्यवसाय सुरळीत चालू देणे व वाहतूक परवानग्या देण्याच्या बदल्यात बेकायदेशीर रकमेची मागणी केली होती. तक्रार प्राप्त होताच दक्षता पथकाने सापळा रचला. मंगळवारी प्रत्यक्ष व्यवहाराच्या वेळी अधिकाऱ्याला ३० हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली. लाचेची संपूर्ण रक्कम पंचांसमक्ष जप्त करण्यात आली.
सापळा कारवाईनंतर अधिकाऱ्याच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता जमविल्याच्या संशयावरून एकाच वेळी भुवनेश्वर येथील फ्लॅट, भद्रक जिल्ह्यातील मूळ निवासस्थान तसेच कटक येथील कार्यालयीन कक्ष येथे झडती घेण्यात आली. या वेळी ट्रॉली बॅग व कपाटांत लपवून ठेवलेली सुमारे ४ कोटी रुपयांची रोकड जप्त झाली. कार्यालयातील ड्रॉवरमधून १.२० लाख रुपये रोखही मिळाले.
याशिवाय भुवनेश्वरजवळील पहला परिसरात दुमजली आलिशान घर, सुमारे १३० ग्रॅम सोने व इतर मालमत्तेचे दस्तऐवजही सापडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू असून, बेकायदेशीर संपत्तीचा तपशील संकलित केला जात असल्याचे दक्षता विभागाने स्पष्ट केले.


