नाशिक प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तश्रृंगी गडावर रविवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघाताने जिल्हा हादरून गेला आहे. गणपती पॉइंट परिसरात संरक्षक कठडा तोडून एक चारचाकी वाहन तब्बल हजार फूट खोल दरीत कोसळल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. श्रद्धेच्या मार्गावर निघालेल्या भाविकांचे असे अकाली निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
नाशिक जिल्ह्यात सप्तश्रृंगी गडावरून एक वाहन कोसळून झालेल्या अपघातात 6 भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू असून संपूर्ण यंत्रणा तेथे…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 7, 2025
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेची गंभीर दखल घेत कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या असून प्रत्येक मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर लिहिले आहे की,
“सप्तश्रृंगी गडावरील वाहन कोसळून सहा भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी सर्व भाविकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदतकार्य तातडीने सुरू असून यंत्रणा सतर्क ठेवली आहे.”

ते पुढे म्हणतात,
“या भाविकांच्या वारसांना राज्य सरकारकडून ५ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाईल.”
अपघात नेमका कसा घडला?
पिंपळगाव बसवंत येथील पटेल कुटुंबातील सात जण देवीच्या दर्शनासाठी गडावर गेले होते. सायंकाळी अंदाजे पाच वाजता, गडावरील गणपती पॉइंट परिसरात येताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वेग नियंत्रणाबाहेर जाताच वाहनाने रस्त्यालगतची संरक्षक भिंत तोडली आणि थेट खोल दरीत कोसळले. घटनास्थळी मोठा आवाज झाल्यानंतर पर्यटकांनी प्रशासनाला माहिती दिली. बचाव पथके तातडीने दाखल झाली; मात्र तोपर्यंत सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
मृतांची नावे
कीर्ती पटेल (५०)
रसीला पटेल (५०)
विठ्ठल पटेल (६५)
लता पटेल (६०)
पचन पटेल (६०)
मणिबेन पटेल (६०)
सप्तश्रृंगी गड परिसरात यापूर्वीही अशा दुर्घटना घडल्या असून रस्त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भाविकांची वाढती गर्दी, अवघड घाटरस्ता आणि वाहनांची ये- जा यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. रविवारी झालेल्या या दुर्घटनेने संपूर्ण जिल्हा शोकमग्न झाला आहे.


