मुंबई प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी महत्त्वाची घडामोड झाली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात 26 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई केल्यानंतर आता न्यायालयाने एका संशयिताचा जामीन अर्जही फेटाळला आहे.
बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी त्यांच्या पुत्र आणि आमदार झिशान सिद्दीकी यांच्या वांद्रेतील कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना तातडीने लीलावती रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. या प्रकरणातील मुख्य संशयित शूटर शिवकुमार गौतमसह एकूण 26 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
या पार्श्वभूमीवर मकोका विशेष न्यायालयाने आरोपी रफीक शेख याचा जामीन अर्ज फेटाळला. सरकारी पक्षाने मांडलेल्या पुराव्यांचा संदर्भ देत न्यायालयाने म्हटले की, जप्त केलेला दारूगोळा, कॉल डेटा रेकॉर्ड (सीडीआर) आणि सहआरोपींचे कबुलीजबाब हे आरोपीच्या सक्रिय सहभागाची पुष्टी करतात.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने सहआरोपी मोहल आणि शिवकुमार गौतम यांच्या कबुलीजबाबाचा उल्लेख करत म्हटले, “उपलब्ध पुराव्यानुसार आरोपीने अनमोल बिष्णोई यांच्या नेतृत्वाखालील टोळीला मदत केली असून हत्येची सोय उपलब्ध करून दिली. प्रत्यक्षदर्शीच्या जबाबातूनही याला आधार मिळतो.
शेखची गुन्हेगारी पार्श्वभूमी, सहआरोपींसोबतचे सीडीआरमधील संभाषण आणि आर्थिक लाभ मिळाल्याची नोंद यामुळे त्याची जामिनावर सुटका झाल्यास पुन्हा गुन्हा घडण्याची शक्यता असल्याचे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आणि जामीन अर्ज फेटाळला.
या निर्णयानंतर हत्याकांडातील पुढील तपास आणखी गती घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


