मुंबई प्रतिनिधी
मुंबई : मुंबई विद्यापीठातील वरिष्ठ लिपिक निकिता विजय राठोड हिला दहा हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. मार्कलिस्ट देण्यासाठी तब्बल 55 हजारांची मागणी केल्याचा आरोप असून, पंधरा हजार रुपये आधीच स्वीकारल्याचेही तपासात उघड झाले आहे.
तक्रारदार हा मुंबई विद्यापीठाचा बी.कॉम विद्यार्थी. परीक्षेनंतर मार्कलिस्ट मिळावी म्हणून त्याने छत्रपती शिवाजी महाराज भवनातील निकाल कक्षेत अर्ज केला होता. यावेळी वरिष्ठ लिपिक राठोड हिने 55 हजारांची मागणी करीत पंधरा हजारांचा पहिला हप्ता घेतला. उर्वरित रक्कमेबाबत ती वारंवार तगादा लावत होती.
तक्रारदाराने आणखी 15 हजार देण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. 10 डिसेंबरला करण्यात आलेल्या शहनिशीत राठोड ही दहा हजारांचा पुढील हप्ता स्वीकारण्यास तयार असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर विद्यापीठ परिसरात सापळा रचून तिला अटक करण्यात आली.
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम 7 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, अटकेनंतर विद्यापीठातील कर्मचारीवर्गात मोठी खळबळ उडाली आहे.


