मुंबई प्रतिनिधी
राज्यात गेल्या काही दिवसांपासून गारठ्याने सर्वसामान्यांचे अक्षरशः कंबरेत वाकवले आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड व कोरड्या वाऱ्यांचा प्रादुर्भाव कायम असल्याने महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये १३ डिसेंबरपर्यंत थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.
किमान तापमानात हळूहळू वाढीची शक्यता
यलो अलर्ट जारी असलेल्या जिल्ह्यांमध्ये १३ डिसेंबर रोजी किमान तापमान ८ ते १० अंश सेल्सियसच्या दरम्यान राहील. त्यामुळे तीव्र थंडीचा अनुभव सुरूच राहण्याची चिन्हे आहेत. मात्र, १३ डिसेंबरनंतर तापमानात किंचित वाढ होऊन थंडीचा कडाका कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. १४ आणि १५ डिसेंबरपासून गारठ्यात थोडा उतार येऊ शकतो.
मध्य महाराष्ट्रात गारठ्याचा प्रभाव
जळगाव, नाशिक (घाट परिसर) आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांत १३ डिसेंबरपर्यंत थंडीची लाट कायम राहणार आहे. त्यानंतर किमान तापमान १० ते १२ अंशांच्या आसपास जाईल. तापमानात ही वाढ झाल्याने नागरिकांना थंडीपासून काहीसा दिलासा मिळेल, असे IMDने स्पष्ट केले.
दक्षिण महाराष्ट्रात थंडी थोडी सौम्य
सोलापूर जिल्ह्यात तापमान हळूहळू वाढून १२ ते १४ अंश सेल्सियसच्या दरम्यान स्थिरावण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात थंडीचा जोर थोडा मवाळ होईल.
विदर्भात सकाळी गारवा टिकणार
नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांत १३ डिसेंबरनंतर थंडीचा प्रभाव कमी होईल. तरीही किमान तापमान १० अंश सेल्सियसच्या आसपासच राहणार असल्याने विशेषतः पहाटेच्या वेळी गारवा जाणवत राहील.
मुंबईत आल्हाददायक हवामान
मुंबईत या दरम्यान किमान तापमान १५ ते १७ अंशांच्या दरम्यान राहील. त्यामुळे हवामान आल्हाददायक, निरभ्र आणि सुखद ठरणार आहे.
नागरिकांनी घ्यावी खबरदारी
थंडीचा प्रभाव लगेच कमी होणार नसल्याने १३ ते १५ डिसेंबरपर्यंत लहान मुले, जेष्ठ नागरिक आणि शारीरिक त्रास असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. गरम कपड्यांचा वापर, गरम पाण्याचे सेवन आणि रात्री व पहाटे अनावश्यक बाहेर पडणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


