मुंबई प्रतिनिधी
राज्यातील आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेकडो शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी महत्त्वाची घडामोड. राज्य सरकारने ३० जून २०२५ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय पक्का केला असून त्यासाठी बॅंकांना आवश्यक माहिती तातडीने तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सहकार विभागाकडून कर्जमाफी प्रक्रियेसाठी स्वतंत्र पोर्टल तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
२७८ लाख कोटींपैकी ३५ हजार कोटींची थकबाकी
राज्यातील १ कोटी ३३ लाख ४४ हजार २०९ शेतकऱ्यांना बॅंकांनी आतापर्यंत तब्बल २ लाख ७८ हजार २६५ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले. मात्र यात २४ लाख ७३ हजार ५६६ शेतकऱ्यांनी ३५ हजार ४७७ कोटींची थकबाकी मुदतीत न भागवता थेट थकबाकीदारांच्या यादित दाखल झाले. २०१७ मध्ये दीड लाख आणि २०१९ मध्ये दोन लाख रुपयांपर्यंतची दिली गेलेली कर्जमाफी अपुरी ठरल्याने अनेक कर्जबाजारी शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेता आला नव्हता.
दरम्यान मागील काही वर्षांतील दुष्काळ, महापूर आणि अस्मानी सुलतानी संकटांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली असून सरकार यावेळी “सातबारा उतारा कोरा” करण्याच्या दिशेने कर्जमाफीची आखणी करत असल्याचे उच्चस्तरीय सूत्रांचे म्हणणे आहे.
१० एप्रिलपर्यंत समितीचा अहवाल
कर्जमाफीसाठी पात्रता निकष ठरवण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या समितीने सहकार आणि कृषी विभागाच्या आयुक्तांशी समन्वय सुरू केला आहे. सतत थकबाकीत राहिलेले, कधीच थकबाकीदार न झालेले, पीकपद्धतीतील बदल, कर्जवापराची प्रवृत्ती यांसह विविध बाबींचा अभ्यास करून समिती १० एप्रिलपर्यंत शासनाला अहवाल सादर करणार आहे.
सहकार विभागाचे पोर्टल तयार
बॅंकांकडून कर्जदारांची माहिती ऑनलाईन भरण्यासाठी सहकार खात्याने स्वतंत्र पोर्टल विकसित करण्यास सुरुवात केली आहे.
“थकबाकीदारांची व चालू कर्जाची माहिती अचूक मिळावी आणि प्रक्रिया पारदर्शक राहावी, म्हणून पोर्टलची आखणी केली जात आहे,” असे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी सांगितले.
दररोज सात शेतकरी आत्महत्या, चिंताजनक वास्तव
मदत व पुनर्वसन विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात दरवर्षी २६०० म्हणजेच रोज सरासरी सात शेतकरी आत्महत्या करत आहेत. अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक विभागांत आत्महत्यांचे प्रमाण सर्वाधिक असून यवतमाळ, बीड, नांदेड, अकोला, बुलढाणा, वर्धा इत्यादी जिल्ह्यांची परिस्थिती सर्वाधिक गंभीर आहे.
कर्जथकबाकीचे चित्र
घटक आकडे
एकूण शेतकरी १,३३,४४,२०९
एकूण कर्जवाटप २,७८,२६५ कोटी
थकबाकीतील शेतकरी २४,७३,५६६
एकूण थकबाकी ३५,४७७ कोटी
राज्यातील शेतकरी कर्जबाजारीपणाचा प्रश्न किती खोलवर गेला आहे, याचे हे आकडे पुरेपूर द्योतक आहेत. येत्या काही आठवड्यांत कर्जमाफीचा अंतिम आराखडा समोर येणार असून राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे भविष्य या निर्णयावर अवलंबून आहे.


