मुंबई प्रतिनिधी
मुंबई :वांद्रे शास्त्रीनगर येथील आबासाहेब शिंदे मार्गावरील रस्तादुरुस्तीची कामे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असल्याने परिसरातील इमारतींना पाणीपुरवठा कमी होत असल्याची समस्या निर्माण झाली आहे. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष विशाल उघडे यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी डी’सुजा यांच्यासोबत चर्चा करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

रस्तादुरुस्तीत सुरू असलेल्या खोदकामामुळे पाणीवाहिन्यांवर ताण येत असून त्यामुळे पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, पुढील दोन ते तीन दिवसांत परिस्थिती सुरळीत होईल, असा विश्वास महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
या चर्चेदरम्यान इमारतीतील रहिवाशी रमेश मोरे, सिद्धार्थ सदाफुळे, अजय सोनावणे, संजय मोरे, अर्जुन शिरवळे उपस्थित होते. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न सुरू असल्याचे अधिकारी वर्गाकडून सांगण्यात आले.


