नाशिक प्रतिनिधी
नाशिकमध्ये 2027 च्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी वेग घेत असताना तपोवन परिसरातील 1,800 झाडे तोडण्याच्या प्रस्तावावरून शहरात संतापाची लाट उसळली आहे. साधू–महंतांसाठी उभारण्यात येणाऱ्या 1,150 एकरांच्या साधूग्रामसाठी झाडांची कत्तल अनिवार्य असल्याचे प्रशासनाचे म्हणणे असले तरी पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी या निर्णयाला जोरदार विरोध दर्शवला आहे.
या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे तपोवनात दाखल झाले आणि “इथले एकही झाड तोडू देणार नाही” असा थेट इशारा सरकारला दिला. तसेच, “साधू आले-गेले तरी काही फरक पडत नाही, पण झाडे गेली तर नाशिकचे नुकसान होईल” या त्यांच्या वक्तव्याने वाद अधिक चिघळला. साधू महंतांनी या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवत, शिंदे यांच्यावर धर्मद्रोहाचे आरोप केले आहेत.
महंत अनिकेत शास्त्री : “वृक्षतोड महापाप; पण संतांचे अवमान स्वीकारार्ह नाही”
काळाराम मंदिराचे महंत अनिकेत शास्त्री म्हणाले,
“वृक्षवल्ली आम्हा सोयरी, संतांनी शिकवलेले तत्व आजही तेवढेच महत्त्वाचे आहे. वृक्षतोड झालीच नाही पाहिजे. पण पर्यावरणाच्या नावाखाली संत-महात्म्यांचा अवमान करणे खेदजनक आहे. कुंभमेळा बंद व्हावा असे बोलणाऱ्यांच्या बुद्धीची कीव आहे. अशा धर्मद्रोह्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.”
तसेच, “कुंभमेळ्यानंतर त्या जागेवर अतिक्रमण होऊ नये, कचरा साचू नये यासाठी सरकार सकारात्मक काम करत असेल तर त्याचे स्वागत. पण वेगळे काही केले, तर त्याचा ठाम विरोध करू,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
महंत सुधीर दास : “सयाजी शिंदेंना कुंभपरंपरेची माहिती नाही”
अखिल भारतीय पंचरामानंदी निर्वाणी आखाड्याचे महंत सुधीर दास म्हणाले,
“तपोवनात 400 वडांची झाडे तोडली जात आहेत असे सांगून सयाजी शिंदेंची दिशाभूल झाली असावी. संत-महात्म्यांवर वैयक्तिक टीका करणे योग्य नाही. आंदोलन करण्याचा अधिकार त्यांना आहे; परंतु कुंभमेळा आणि संतपरंपरेबद्दल बोलताना अधिक जबाबदारी अपेक्षित आहे.”
सयाजी शिंदे : “झाडे म्हणजे आई–बाप; हल्ला सहन करणार नाही”
सयाजी शिंदे यांनी आपल्या भूमिकेची पुनरुज्जीवने केली.
“झाडे ही आपली आई-बाप आहेत. त्यांच्यावर हल्ला झाला तर आम्ही गप्प बसणार नाही. तपोवनातील झाडे वाचवण्यासाठी नाशिककरांचा लढा योग्य आहे. सरकारने जनभावना समजून घेतली पाहिजे,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले,
“भारताचा राष्ट्रीय वृक्ष वड आहे. एकाच वडावर ५००-६०० प्रजाती अवलंबून असतात. मोठी झाडे अधिक ऑक्सिजन देतात, अधिक कार्बन शोषतात. अशी झाडे तोडणे हा अपराधच आहे. कुणालाही माफी नाही.”
कुंभमेळ्याच्या नियोजनावरून उद्भवलेला हा संघर्ष आता तापू लागला आहे. एका बाजूला पर्यावरणसंरक्षणाचा प्रश्न तर दुसऱ्या बाजूला धार्मिक परंपरा, या दोन्हींच्या टोकावर उभे राहून नाशिककरांचे आंदोलन अधिक व्यापक होत चालले आहे. पुढील घडामोडींवर राज्याचे लक्ष लागले आहे.


