गोवा:
उत्तर गोव्यातील अर्पोरा परिसरातील एका नाईट क्लबमध्ये शनिवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत तब्बल २३ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मृतांमध्ये तीन महिला आणि २० पुरुषांचा समावेश असून काही पर्यटकांचाही यात समावेश असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
#WATCH | Arpora | Goa DGP Alok Kumar says, "An unfortunate incident occurred in a restaurant-cum-club in Arpora. At 12.04 am, the police control room received information about a fire, and the police, fire brigade, and ambulances were rushed to the spot. The fire is now under… https://t.co/8Lv18IvNoh pic.twitter.com/WyjMBuuvSv
— ANI (@ANI) December 6, 2025
रात्रभर चाललेल्या बचावकार्यादरम्यान आगीचा धूर आणि गुदमरल्याने बहुतेकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.
घटना कळताच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मध्यरात्रीच घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. “ही अत्यंत दुर्दैवी घटना असून सखोल चौकशीसह दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. सुरक्षा नियमांचे उल्लंघन सहन केले जाणार नाही,” असे ते म्हणाले.
दरम्यान, गोवा डीजीपी आलोक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, “रात्री १२.०४ वाजता नियंत्रण कक्षाला आग लागल्याची माहिती मिळाली. पोलिस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका पथके तात्काळ घटनास्थळी रवाना झाली. रात्रीभर सुरू असलेल्या बचाव कार्यात आतापर्यंत २३ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सर्व मृतदेह बांबोलीम येथील जीएमसी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.”
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी सिलेंडर स्फोटाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, पोलिसांनी याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी दिलेली नाही. क्लबमधील अग्निसुरक्षा उपाय, परवानग्या, इमारत संरचना आणि नियमांचे पालन याची तपशीलवार तपासणी सुरू आहे. निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
स्थानिक आमदार मायकल लोबो यांनीही रात्रीभर बचाव पथकांसोबत समन्वय साधत परिस्थितीचे निरीक्षण केले. “पथकांचे प्रयत्न सुरू असून मृतांची संख्या दुर्दैवाने २३ वर पोहोचली आहे,” असे ते म्हणाले.
पर्यटन हंगामात घडलेली ही भीषण घटना राज्य प्रशासनासमोर सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे. तपास सुरू असून पुढील काही तासांत आगीच्या मूळ कारणाबाबत अधिक स्पष्ट माहिती मिळण्याची शक्यता आहे.


