गोवा :
दक्षिण गोव्याच्या गोकर्ण जीवोत्तम मठात उभारण्यात आलेल्या प्रभू श्रीरामांच्या ७७ फुट उंच कांस्य पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडले. शिल्पकार राम सुतार यांनी साकारलेला हा पुतळा ‘जगातील सर्वात उंच प्रभू राम मूर्ती’ म्हणून नोंदवला जाणार असून, अनावरण सोहळ्यास प्रसंगी मठाचे केंद्रीय समिती अध्यक्ष श्रीनिवास डेम्पो यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
#WATCH | Canacona, South Goa | Addressing the 550th-year celebration of the Shree Samsthan Gokarn Partagali Jeevottam Math, PM Modi says, "…I want to make nine requests. These requests are like nine resolutions. The dream of a Viksit Bharat will only be realised when we protect… pic.twitter.com/knlBKc65oq
— ANI (@ANI) November 28, 2025
समारंभानंतर प्रधानमंत्री मोदींनी जनतेला उद्देशून करताना ‘विकसित भारत’ संकल्पाशी निगडित अनेक महत्त्वपूर्ण आवाहने केली. “पाणी वाचवा, झाडे लावा, स्वच्छतेचे पालन करा, स्वदेशी उत्पादनांचा स्विकार करा, भारत दर्शनाला प्रोत्साहन द्या, नैसर्गिक शेती पद्धतींचा अवलंब करा,” असे आवाहन करत त्यांनी आरोग्यदायी जीवनासाठी बाजरीचा समावेश, तेलाचे प्रमाण कमी करणे, योग-व्यायामाचा अंगीकार आणि गरिबांना मदतीचा हात देण्याचेही आवाहन केले.
“अयोध्येतील राम मंदिरावर पवित्र ध्वज फडकल्यानंतर केवळ काही दिवसांत जगातील सर्वात उंच प्रभू रामाच्या पुतळ्याचे अनावरण करण्याची संधी लाभणे माझ्यासाठी आनंदाची आणि गौरवाची गोष्ट आहे,” असे मोदींनी यावेळी सांगितले.
गोव्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत यांनीही या प्रसंगी बोलताना, “ही नवी मूर्ती मठाचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधिक वृद्धिंगत करेल. अलीकडच्या वर्षांतील हा सर्वात मोठा सोहळा असल्याचे” म्हटले.
‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे खास नाते
गोकर्ण जीवोत्तम मठातील प्रभू रामाच्या पुतळ्याचा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’शी खास संबंध आहे. गुजरातमधील श्री सरदार पटेलांच्या जगप्रसिद्ध स्मारकाचे डिझाईन करणारे शिल्पकार राम सुतार यांनीच हा ७७ फुटांचा भव्य पुतळा साकारला आहे. त्यामुळे या शिल्पकृतीला आगळंवेगळं ऐतिहासिक आणि कलात्मक महत्त्व प्राप्त झाले आहे.


