मुंबई प्रतिनिधी
देशातील बँकिंग ग्राहकांना मोठा दिलासा देणारा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं जाहीर केला आहे. दिवसेंदिवस डिजिटल व्यवहार वाढत असताना, ग्राहकांकडून आकारल्या जाणाऱ्या बँकिंग शुल्कांवर अनेकदा तक्रारी होत असतात. किमान शिल्लक राखण्याची सक्ती, मर्यादित मोफत व्यवहार आणि अतिरिक्त चार्जेस यामुळे सामान्य खातेदारांच्या अडचणी वाढत होत्या. या पार्श्वभूमीवर RBI ने बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट (BSBD) खात्यांसंदर्भात मोठ्या सुधारणा जाहीर करत सर्व खातेदारांना मोठा दिलासा दिला आहे.
BSBD खाते : आता पूर्णपणे झिरो बॅलन्स
आरबीआयच्या नव्या नियमांनुसार, BSBD खाते आता देशातील कोणत्याही बँकेत शून्य बॅलन्सवर चालणार आहे. मिनिमम अॅवरेज बॅलन्स (MAB) राखण्याची सक्ती पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. खाते शून्य बॅलन्सवर गेले तरी दंड आकारला जाणार नाही किंवा खाते बंद केले जाणार नाही. हा नियम देशातील सर्व बँकांवर आणि सर्व ग्राहकांवर लागू असेल, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे.
ग्राहकांना मिळणार मोफत सुविधा
नवीन BSBD खाते देशातील सर्वसामान्यांसाठी सर्वात सोपी आणि स्वस्त बँकिंग सेवा ठरत आहे. या खात्यात बँकांना खालील सुविधा पूर्णपणे मोफत देणे बंधनकारक असेल:
डेबिट कार्ड मोफत – कोणतेही वार्षिक शुल्क नाही
वर्षाला २५ चेक पाने मोफत
UPI, NEFT, RTGS, IMPS, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग सर्व मोफत
कोणतेही गुप्त किंवा अतिरिक्त शुल्क नाही
डिजिटल पेमेंट्सची मर्यादा देखील पूर्णपणे हटवण्यात आली आहे. ग्राहक कितीही वेळा UPI किंवा इतर डिजिटल पद्धतीने व्यवहार करू शकतात.
ATM व शाखेतील व्यवहारांची मर्यादा कायम
डिजिटल सुविधांवर कोणतीही मर्यादा नसली तरी, महिन्याला चार वेळा ATM किंवा शाखेतून मोफत पैसे काढण्याची मुभा दिली आहे. त्यानंतरची व्यवहार शुल्क आकारूनच होतील.
जुन्या खात्यांना बदलण्याची सोय
ग्राहकांचे सध्याचे सेव्हिंग अकाऊंट BSBD मध्ये रूपांतर करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. हा बदल पूर्णपणे मोफत असेल आणि फक्त सात दिवसांत पूर्ण होऊ शकेल. यानंतर नव्या BSBD खात्यातील सर्व सुविधा त्वरित लागू होतील. आधीच्या BSBD खातेधारकांनाही या सुधारित सुविधा आपोआप लागू होतील.
एका व्यक्तीला फक्त एकच BSBD खाते
खाते उघडताना केवळ स्व-घोषणापत्र आवश्यक असून पूर्ण KYC प्रक्रिया बंधनकारक आहे. खाते उघडण्यासाठी एक रुपयाही लागत नाही. मात्र, एका व्यक्तीला एकाच बँकेत किंवा वेगवेगळ्या बँकांत मिळून एकच BSBD खाते ठेवता येईल.
आरबीआयच्या या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपासून ते डिजिटल व्यवहारांवर अवलंबून असलेल्या सर्वच ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. झिरो बॅलन्स, मोफत डिजिटल व्यवहार आणि कोणतेही लपलेले शुल्क नसल्याने BSBD खाते आता खऱ्या अर्थानं जनसामान्यासाठीची सार्वत्रिक बँकिंग सेवा ठरणार आहे.


