मुंबई प्रतिनिधी
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमी, दादर येथे देशभरातून येणाऱ्या लाखो अनुयायांना दिलासा मिळावा, यासाठी त्या दिवशी मुंबईकडे येणाऱ्या वाहनांना टोलमाफी द्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या खासदारांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे बुधवारी नवी दिल्ली येथे भेट घेऊन केली.
दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी मोठ्या संख्येने चैत्यभूमीवर दाखल होतात. खासगी व प्रवासी वाहनांमधून लांबवरून येणाऱ्यांना महामार्गांवरील टोलदरांचा आर्थिक भार सहन करावा लागतो. याच पार्श्वभूमीवर एकदिवसीय टोलमाफी जाहीर करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदन देताना खा. बळवंत वानखडे (अमरावती), खा. वर्षा गायकवाड (मुंबई), खा. डॉ. कल्याण काळे, खा. डॉ. शिवाजी काळगे आणि खा. रवींद्र चव्हाण उपस्थित होते. केंद्र सरकारने या मागणीचा सकारात्मक विचार करून बाबासाहेबांच्या अनुयायांच्या भावना व अस्मितेला मान द्यावा, अशी अपेक्षा खासदारांनी व्यक्त केली.


