मुंबई प्रतिनिधी
राज्य सरकारने गुरुवारी तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करत प्रशासकीय पातळीवर महत्त्वाचे फेरबदल केले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव पद सोडल्यानंतर नियुक्तीच्या प्रतिक्षेत राहिलेल्या अविनाश ढाकणे यांना अखेर नवी जबाबदारी मिळाली असून त्यांची मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ढाकणे यांच्या नियुक्तीमुळे सध्या या पदावर कार्यरत असलेल्या अमित सैनी यांना बदल्यांच्या पुढील टप्याची प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून राजेश अग्रवाल यांची नेमणूक झाल्याने रिक्त झालेल्या सामान्य प्रशासन विभागातील प्रशासकीय नाविन्यता, उत्कृष्टता आणि सुशासन या विभागाच्या प्रधान सचिवपदी अतुल पाटणे यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीसाठी संबंधित पदाचे अवनयन (downgrade) करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
याशिवाय, माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक कान्हुराज बगाटे यांची मंत्रालयात बदली करून त्यांना नियोजन विभागाच्या सहसचिवपदी नेमण्यात आले आहे.
राज्य प्रशासनात झालेले हे फेरबदल आगामी कामकाज आणि विभागीय रचनेवर प्रभाव टाकणारे ठरणार असल्याचे मानले जात आहे.


