मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकपदी वरिष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांची निवड करण्यात आली असून, 31 डिसेंबर रोजी निवृत्त होणाऱ्या रश्मी शुक्लांच्या उत्तराधिकारी म्हणून दाते येत्या काही दिवसांत पदभार स्वीकारणार आहेत. राज्य सरकारकडून सात वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे शॉर्टलिस्ट करून ती यूपीएससीकडे पाठवण्यात आली होती. त्यातूनच दाते यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले.
1990 साली आयपीएस सेवेत दाखल झालेले दाते हे शिस्तप्रिय, प्रामाणिक आणि कारवाईत तत्पर अधिकारी म्हणून ओळखले जातात. आर्थिक गुन्हे शाखा, सायबर क्राईम, रेल्वे पोलिस, नवी मुंबईचे पोलीस अधीक्षक अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. सध्या ते राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. नवे DGP म्हणून त्यांचा कार्यकाळ डिसेंबर 2027 पर्यंत असणार आहे.
यापूर्वी गृहविभागाने पाठवलेल्या यादीत संजीव कुमार सिंगल, संजय वर्मा, अर्चना त्यागी, संजीव कुमार, रितेश कुमार आणि प्रशांत बुरडे या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही नावे होती. मात्र, राज्याच्या पोलिस संघटनेत नेतृत्वक्षम अधिकारी म्हणून दाते यांचे नाव पहिल्यापासूनच सर्वाधिक चर्चेत होते.
26/11 हल्ल्यातील शौर्य
मुंबईवर झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्यादरम्यानही दाते यांनी धाडसाचे उदाहरण ठेवले होते. तेव्हा क्राइम ब्रांचमध्ये कार्यरत असताना कामा रुग्णालयात घुसलेल्या दोन दहशतवाद्यांविरुद्ध त्यांनी काही सहकाऱ्यांसह प्रत्यक्ष लढा दिला. गोळ्या लागूनही त्यांनी शौर्य न गमावता रुग्णालयातील ओलिसांना सुरक्षित बाहेर काढण्यात मोलाची मदत केली होती. त्यामुळे त्यांची प्रतिमा ‘डॅशिंग’ आणि जोखमीच्या परिस्थितीतही निर्णयक्षम अधिकारी अशी तयार झाली.
महाराष्ट्राच्या पोलिस दलाच्या नेतृत्वात आता दाते यांचा प्रवेश होत असताना, पुढील काळात कायदा-सुव्यवस्थेपासून ते दहशतवादविरोधी कारवाईपर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांच्या खांद्यावर असणार आहेत. राज्यातील सुरक्षाव्यवस्थेच्या दृष्टीने हा बदल महत्त्वपूर्ण मानला जात आहे.


