मुंबई प्रतिनिधी
कोकणातील प्रति पंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या आणि लाखो भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र ठरलेल्या आंगणेवाडीतील भराडी देवी यात्रेची तारीख यंदाही पारंपरिक पद्धतीने निश्चित झाली आहे. देवीचा कौल लागल्यानंतर आगामी वर्षी ९ फेब्रुवारीपासून दीड दिवसांची जत्रा सुरू होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.
तारीख जाहीर होताच कोकणभरात उत्साहाचं वातावरण पसरलं असून रेल्वे, खासगी वाहनं आणि निवास व्यवस्थांच्या बुकिंगची लगबग सुरू होणार आहे. यात्रेदरम्यान राज्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती असते.
नवसाला पावणारी भराडी देवी
सिंधुदुर्गातील मालवण तालुक्यातील मसुरे गावाच्या आंगणेवाडी वाडीत भराडी देवीचे प्राचीन मंदिर आहे. माळरानावर देवीची प्रकटलेली मूर्ती,यावरूनच ‘भराडी’ हे नाव रूढ झालं. आंगणे कुटुंबीयांची खासगी देवस्थान अशी नोंद असली, तरी नवसाला पावणारी देवी म्हणून सर्व भाविकांसाठी दर्शन खुले असते.
दरवर्षी दीड दिवसांच्या जत्रेत ५ ते ७ लाख भाविक दर्शनासाठी येतात. आंगणे कुटुंबीयांच्या माहेरवाशिणी अबोल राहून देवीचा नैवेद्य तयार करतात, तर गावातील महिला सर्वांसाठी प्रसादाची व्यवस्था करतात.
धार्मिकतेसोबत सांस्कृतिक सोहळाही
यात्रेदरम्यान आंगणे ग्रामस्थ सादर करत असलेलं मांडावरचं नाटक, मिरजेहून येणाऱ्या गोंधळ्यांचा गोंधळ, दशावतार आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम यात्रेची शोभा वाढवतात. भाविक आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून देवीसमोर नवस बोलतात, गाऱ्हाणी मांडतात.
आंगणेवाडीला पोहोचायचं कसं?
कणकवली आणि कुडाळ रेल्वे स्थानकांवरून शेअर रिक्षा सहज उपलब्ध आहेत. दोन्ही बस डेपोतून आंगणेवाडीच्या दिशेने दर अर्ध्या तासाला एसटी बस सुटते आणि तिकीट दरही माफक ठेवण्यात आला आहे. खासगी वाहनांनी प्रवास करणाऱ्यांसाठी मुंबई–गोवा महामार्गावरून कुडाळ–कसाल–कणकवली मार्गे आंगणेवाडीपर्यंत सहज पोहोचता येतं.
आंगणेवाडी जत्रा ही केवळ धार्मिक नव्हे, तर कोकणाच्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि श्रद्धेचा महोत्सव मानला जातो. यंदाची तारीख जाहीर झाल्याने भाविकांमध्ये उत्सुकता आणि उत्साह दोन्हीही दुणावले आहेत.


